नवी दिल्ली : देशभरात नैऋत्य मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा लक्षणीय कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 315 जिल्ह्यांना कमी पर्जन्यमानाचे संवेदनशील जिल्हे म्हणून ओळखले आहे. खरीप हंगामातील पिकांवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन या जिल्ह्यांमध्ये विशेष तयारी आणि देखरेख सुरू करण्यात आली आहे. उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, आतापर्यंत देशात सरासरीपेक्षा सुमारे 43 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2 जुलैपर्यंतही पावसाची स्थिती कमकुवत राहण्याची शक्यता आहे. मान्सून उशिरा येणे आणि कमी पाऊस पडणे याचा सर्वाधिक फटका पावसावर अवलंबून असलेल्या शेती क्षेत्रांना बसू शकतो.
कृषी मंत्रालय आणि भारतीय कृषी संशोधन परिषद यांच्या संयुक्त आढाव्यानुसार 315 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी 111 जिल्ह्यांना उच्च प्राधान्य श्रेणी देण्यात आली आहे, जिथे सिंचनाचे क्षेत्र 25 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तसेच 76 जिल्हे मध्यम प्राधान्य श्रेणीत, तर 128 जिल्हे तुलनेने चांगल्या सिंचन सुविधांमुळे कमी प्राधान्य श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. हे जिल्हे प्रामुख्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये आहेत.
कृषी मंत्र्यांनी सांगितले की, परिस्थिती अधिक गंभीर होण्याची वाट न पाहता सरकारने आधीच तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्हास्तरावर आपत्कालीन कृषी कृती आराखडे कार्यान्वित करण्यात आले आहेत. आयसीएआर आणि आयसीएआर-क्रिडा यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा कृषी आपत्कालीन कृती आराखडा (District Agriculture Contingency Plan) तयार केला आहे. या आराखड्यात स्थानिक पर्जन्यमान, हवामान, जलस्रोतांची उपलब्धता, पीक पद्धती आणि संभाव्य जोखमींचा विचार करण्यात आला आहे.
कमी पाऊस पडणाऱ्या भागांमध्ये पर्यायी पिकांना प्रोत्साहन देणे, पीक विविधीकरण वाढवणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे यावर सरकारने भर दिला आहे.राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासनाला या योजना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष शेतपातळीवर प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जलसंधारणालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. तलाव, जलाशय, ओढे, शेततळे, चेकडॅम, स्टॉपडॅम आणि तात्पुरत्या जलसाठा संरचनांची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत, जेणेकरून कमी पावसाच्या परिस्थितीत अधिकाधिक पाणी साठवता येईल.
संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासह आवश्यकतेनुसार पाणीसमृद्ध भागांतून पाणी पुरविण्याची व्यवस्था करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.केंद्र सरकारने कमी कालावधीत येणारी आणि कमी पाण्यात घेता येणारी पिके घेण्यास प्रोत्साहन देण्याचा सल्ला राज्यांना दिला आहे. मान्सूनचा विलंब कायम राहिल्यास शेतकऱ्यांना पर्यायी पिकांकडे वळविण्याची तयारीही सुरू आहे. कृषी मंत्री म्हणाले की, खरीप हंगामातील कृषी कामकाजावर परिणाम होऊ नये आणि शेतकऱ्यांचा धोका कमीत कमी राहावा, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

















