सरकारला, साखर कारखानदारांना सोडणार नाही: राजू शेट्टी

कोल्हापूर : ‘भाजप सरकारने एफआरपीप्रश्नी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक अशीच सुरू राहिली तर सरकारला आणि साखर कारखानदारांना  सोडणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच भाजपच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. भाजपच्या बूथप्रमुखांशी संवादाताना पंतप्रधान मोदी यांनी उसाची एफआरपी थकीत नसल्याचे सांगितले आहे. त्यावर खासदार राजू शेट्टी यांनी टिका केली. मोदी एक नंबरचे थापाडे आहेत. तर त्यांचे मंत्री किती थापा मारतील याचा केवळ अंदाज करा. या राज्यकर्त्यांना आम्ही सोडणार नाही, अशा शब्दांत खासदार शेट्टी यांनी त्यांचा समाचार घेतला.

कोल्हापुरातील वीज दर आंदोलनप्रसंगी खासदार शेट्टी यांनी कारखानदारांच्या उपस्थितीतच सगळ्यांना ठणकावले. खासदार शेट्टी म्हणाले, ‘सरकार प्रत्येकवेळी बैठका, चर्चेचा फार्स निर्माण करते आणि शेतकरी हिताचा कोणताही निर्णय घेत नाही. देशातील साखर कारखानदारांकडे हजारो कोटी रुपयांची एफआरपी  थकबाकी आहे. पण, अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून कसलीही तरतूद होताना दिसत नाही. दुसरीकडे पंतप्रधान खोटी आकडेवारी सांगून नागरिकांची दिशाभूल करत आहेत.’

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, या मागणीचा खासदार शेट्टी यांनी पुनरुच्चार केला.  ते म्हणाले, ‘एकरकमी एफआरपी हवी आहे. आता शेतकऱ्यांचा संयम सुटत आहे. सरकारच्या यंत्रणाही नागरिकांना लुबाडत आहेत. शेतकऱ्यांना अडवणुकीचे हे धोरण असेच राहिले तर, त्यांना अद्दल घडवली जाईल.’

सरकारने माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करावेत. शेतकरी हितासाठी मी त्याला घाबरत नाही, असेही खासदार शेट्टी यांनी सांगितले.

डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here