कोल्हापूर : गायरान अतिक्रमणे कायम करण्यासाठी राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. गायरान अतिक्रमणे कायम करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गायरान, गावठाण व वन विभागातील जमिनीवरील अतिक्रमणे कायम करावीत या मागणीसाठी बुधवारी (19 जुलै 2023) मुंबईत आझाद मैदान ते विधानभवन असा विशाल मोर्चा आयोजित केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवारी 19 जुलै रोजी दुपारी 12 वाजता हा मोर्चा आझाद मैदानातून सुरु होणार आहे. या मोर्चाला बीआरएस, पीसीपीआय, सीपीआय (एम), शेकाप, स्वाभिमानी पक्ष, जनता दल (सेक्युलर) समाजवादी पार्टी, आरपीआय (सेक्युलर), एकलव्य सेना, लाल निशाण पक्ष, बहुजन विकास आघाडी, सीपीआय (एमएल) सत्यशोधक कम्यूनिस्ट पार्टी या पक्षांनी सक्रिय पाठींबा जाहीर केला आहे. राज्यातील सर्व अतिक्रमण धारकांनी 19 जुलै रोजी हक्काच्या लढाईसाठी मुंबईतील आझाद मैदानावर हजर रहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.