मुंबई : प्रतिकूल हवामान, उसाच्या उत्पादनात झालेली घट आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी गाळप हंगामापूर्वी साखर कारखान्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे सवलतीच्या दरातील कर्ज (सॉफ्ट लोन) देण्याची तयारी दर्शवली आहे. सहकार विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून अंतिम मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवला असल्याची माहिती आहे. ‘सकाळ’ने याबाबत वृत्त दिले आहे.
केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने राज्य सरकारने या प्रकरणात पुढाकार घेतला आहे. हवामानातील बदल आणि वाढत्या तापमानाचा परिणाम यंदाच्या ऊस उत्पादनावर झाला असून, उत्पादनात सुमारे १२ ते १५ टक्क्यांची घट झाल्याचे सांगितले जात आहे.त्याचबरोबर वाढत्या उष्णतेमुळे यंदाचा गाळप हंगाम केवळ ८० ते ९० दिवसांत आटोपला. या परिस्थितीमुळे साखर उद्योगाला सुमारे ३,३०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा दावा करण्यात आला आहे.याशिवाय, केंद्र सरकारच्या धोरणानुसार धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ७० टक्के कोटा देण्यात आल्याने त्याचाही साखर कारखान्यांच्या महसुलावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी साखर कारखानदारांनी साखरेची किमान विक्री किंमत (MSP) वाढवावी तसेच कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी केली होती.मात्र, या मागण्यांवर केंद्र सरकारकडून तीन महिने उलटूनही निर्णय न झाल्याने राज्य सरकारने सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा पर्याय पुढे केला आहे.सहकार विभागाच्या प्रस्तावानुसार, संबंधित साखर कारखान्यांचे ताळेबंद, आर्थिक स्थिती आणि कामगिरी तपासल्यानंतर सॉफ्ट लोनचे वाटप केले जाणार आहे.
या कर्जावर अंदाजे ६०० कोटी रुपयांचे व्याज द्यावे लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्याजाचा भार राज्य सरकार उचलणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामापूर्वी काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


















