नवी दिल्ली : वाढत्या अल निनो प्रभावामुळे आणि देशातील पावसावर अवलंबून असलेल्या प्रमुख कृषी क्षेत्रामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने यंदाच्या खरीप हंगामातील तेलबिया आणि कापूस पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. असा इशारा डोलत कॅपिटलच्या ताज्या अहवालात देण्यात आला आहे.अहवालानुसार, खरीप पिकांची पेरणी वेगाने सुरू असून आतापर्यंत 531.3 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत पेरणीतील तूट कमी होऊन 18.1 लाख हेक्टर इतकी राहिली आहे.मात्र, भारतीय हवामान विभाग (IMD) च्या विस्तारित अंदाजानुसार पुढील दोन आठवड्यांत देशभरात एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून, त्यामुळे पिकांच्या वाढीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
‘या’ राज्यांमध्ये कमी पावसाचा अंदाज
अहवालानुसार राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक या भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर केरळ, पूर्व-मध्य भारतातील काही भाग आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 12 जुलैपर्यंत देशातील एकूण पावसाची तूट 17.8 टक्क्यांवर आली असून, आठवडाभरापूर्वी ती 20 टक्के होती. सर्वाधिक तूट पूर्व व ईशान्य भारतात (-37 टक्के) आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागात (-20 टक्के) नोंदविण्यात आली आहे. तर मध्य भारत (-5 टक्के) आणि उत्तर-पश्चिम भारत (-9 टक्के) येथे परिस्थिती तुलनेने चांगली आहे.
भात आणि ऊस पेरणीत वाढ, तेलबिया व कापूस मागे
अहवालानुसार, भाताची लागवड वेगाने झाल्यामुळे त्याचे क्षेत्र 114.7 लाख हेक्टर झाले असून, ते सरासरीपेक्षा 17 लाख हेक्टर अधिक आहे.ऊस लागवडीचे क्षेत्रही 57.6 लाख हेक्टर झाले असून, ते सरासरीपेक्षा 2.4 लाख हेक्टर अधिक आहे.दुसरीकडे, कडधान्यांची पेरणी 56.6 लाख हेक्टर झाली असून ती पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा 5.6 लाख हेक्टर कमी आहे. भरड धान्यांची पेरणी 98.7 लाख हेक्टर झाली असून ती सरासरीपेक्षा 2.7 लाख हेक्टर कमी आहे.
तेलबिया आणि कापूस पेरणीत अजूनही तूट
अहवालात म्हटले आहे की, एकूण पेरणीतील तूट मुख्यतः तेलबिया आणि कापूस या पिकांमध्येच आहे. तेलबियांची पेरणी 117.8 लाख हेक्टर झाली असली तरी ती अद्याप सरासरीपेक्षा 13 लाख हेक्टर कमी आहे. मात्र, मागील आठवड्याच्या तुलनेत या तुटीत काहीशी सुधारणा झाली आहे. सोयाबीन आणि भुईमूग पेरणीही अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. कापसाची पेरणी 79.5 लाख हेक्टर झाली असून ती सरासरीपेक्षा 16.3 लाख हेक्टर कमी आहे.
पुढील काळात पावसात सुधारणा होण्याची शक्यता
डोलत कॅपिटलच्या मते, वायव्य बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे नवीन चक्रीवादळी परिसंचरण आणि मान्सून द्रोणीची सामान्य स्थिती यामुळे येत्या काही दिवसांत मध्य आणि पूर्व भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.


















