सांगली : हुतात्मा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या साप्ताहिक बैठकीत शनिवारी मोठा गोंधळ उडाला. अध्यक्ष वैभव नायकवडी यांना सभासद आणि आंदोलकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. “आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या; मगच बैठक सुरू होईल,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर वैभव नायकवडी यांनी पुत्र वीरधवल नायकवडी यांच्यासह सभात्याग केला. कारखान्याच्या बैठकीला वैभव नायकवडी बैठकीस उपस्थित राहणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारखान्याच्या गेस्ट हाऊस सभागृहात बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळाने वैभव नायकवडी तेथे पोहोचले. त्यानंतर गौरव नायकवडी, केदार नायकवडी आणि काही सभासद व आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी केली.
यावेळी वैभव नायकवडी यांनी, “प्रथम बैठकीतील विषयांवर चर्चा करू, त्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे देतो,” असेसांगितले. मात्र आंदोलकांनी त्यास नकार देत आधी स्पष्टीकरण देण्याचा आग्रह धरला. वातावरण अधिक तणावपूर्ण होताच वैभव नायकवडी सभागृहातून बाहेर पडले. बाहेर जाताना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गौरव नायकवडी म्हणाले, “वैभव नायकवडी यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळले आणि बैठकीतून पळ काढला. ते पोलिसांचा ताफा घेऊन आले होते. कारखान्यातील अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येणारा गळीत हंगाम विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. ते केवळ स्वतःचे पद वाचवण्यासाठी बैठकीला आले होते.
केदार नायकवडी म्हणाले, वैभव नायकवडी यांनी बैठकीपूर्वी रजेचा अर्ज दिला होता. मात्र, ते अचानक बैठकीला आले. त्यानंतर उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. वैभव नायकवडी यांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता काही ठराव केले होते. ते ठराव या बैठकीत रद्द करण्यात आले. सभासदांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी म्हणून बैठक एक तास तहकूब करण्याची सूचना केली होती; मात्र चर्चा टाळण्यासाठी त्यांनी सभात्याग केला.” यावेळी हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
साखर चोरीप्रकरणी निकालानंतर संचालक कोठडीत असतील : केदार नायकवडी
“कथित साखर मात्र वैभव नायकवडी यांनी सहकार मंत्र्यांकडून याबाबत स्थगिती आदेश आणला आहे. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी साखर चोरी मान्य केली आहे. त्याबाबत आम्ही संबंधित शासकीय कार्यालयात म्हणणे मांडून महिनाभराच्या आत याबाबत निकाल होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार आहोत. याप्रकरणी निकाल दिल्यानंतर कारखान्याच्या सगळ्या संचालकांच्या घरी पोलिस जातील. कारखान्यात मोठ्या प्रमाणात चोरीप्रकरणी वैभव नायकवडी यांनी स्थगिती आदेश आणून चोरीची कबुलीच दिली आहे. या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सगळे संचालकच कोठडीत असतील,” अशी माहिती केदार नायकवडी यांनी वैभव नायकवडी यांचा राजीनामा व भ्रष्टाचाराबाबत सुरू असलेल्या आंदोलनस्थळी येथे दिली. भ्रष्टाचार झाला आहे आणि त्यात सहभागी प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार आहोत.’केदार नायकवडी म्हणाले, ‘वैभव नायकवडी यांनी १७० कोटी रुपयांची साखर चोरी केली आहे. याबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात सुनावणी सुरू आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी बैठकीत गोंधळ घातला : वैभव नायकवडी
हुतात्मा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या साप्ताहिक बैठकीसाठी मी अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे हजर राहिलो. पण मीटिंगमध्ये साखर कारखान्याशी काहीही संबंध नसणारे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही लोक वेगळ्या हेतूने उपस्थित होते. त्यांना फक्त गोंधळच करायचा होता,” असे वैभव नायकवडी यांनी वाळवा येथे पत्रकार परिषदेत सांगितले. वैभव नायकवडी म्हणाले, “संचालक मंडळाची बैठक काही लोकांनी आपल्या ताब्यात घेतली होती. बैठक व्यवस्थित पार पडावी, यासाठी पोलिस आले होते. पण पोलिसांनाही दमदाटी करण्यात आली. संचालक मंडळाच्या सभेसाठीची हजेरी वही सुद्धा गायब करून मला सही करण्यापासून रोखण्यात आले. सुरू असणाऱ्या आंदोलनाचा संकुलातील इतर संस्थांवरही परिणाम सुरू झाला आहे. हुतात्मा बँकेतील ठेवी काढल्या जात आहेत. आंदोलकांनी याचा शांतपणे विचार करून आंदोलन थांबवावे.”
ते म्हणाले, “जनतेच्या कामासाठी खुर्चा महत्त्वाच्या नाहीत. माझ्यावर जाणूनबुजून काही लोक अनेक चुकीचे आरोप करत आहेत. काही लोकांनी कारखान्यातील साखरेबाबत प्रादेशिक वैभव नायकवडी सहसंचालक, कोल्हापूर यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत जो अहवाल देण्यात आला होता, तो एकतर्फी असल्याने सहकार मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली आहे. हे प्रकरण पूर्ण न्यायप्रविष्ट असताना, आचारसंहिता काळात जमा जमवणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य करणे बरोबर नाही.” नायकवडी म्हणाले, “काल माझी तब्येत बरी नसल्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीसाठी रजेचा अर्ज दिला होता. पण आज तब्येत ठीक झाल्यामुळे संचालक मंडळाच्या मीटिंगसाठी उपस्थित राहिलो. गळीत हंगामाच्या तोंडावर हंगामाची तयारीपेक्षा कुरघोड्यांचे प्रकार थांबवून हुतात्मा साखर कारखाना व संकुलातील इतर संस्था कशा चांगल्या पद्धतीने चालतील, याचा विचार करून आंदोलकांनी पुढील पावले उचलावीत.”


















