सांगली: हुतात्मा साखर कारखान्यातील कर्जमुक्तीच्या आणि कथित गैरव्यवहाराबाबत सलग चौथ्या दिवशी आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाला कारखान्याच्या १२ विद्यमान संचालकांनी आंदोलकांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान, काही वरिष्ठ नेत्यांकडून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कारखाना कर्जमुक्त झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सायंकाळी कारखान्यासमोर आंदोलकांची भेट देऊन वैभव नायकवडी यांच्यावतीने समेट घडवण्याचा प्रयत्न केला. मात्र किरण नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांनी त्यास दाद दिली नाही.
आंदोलनाला सर्व संचालकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, गौरव नायकवडी व केदार नायकवडी यांनी केले होते. त्यानुसार गौरव यांच्यासह रामचंद्र भाडळकर, तुकाराम डवंग, शरद माळी, बापूसाहेब पाटील, गंगाराम सूर्यवंशी, शरद थोरात, संभाजीराव पाटील, लक्ष्मण शिंदे, शिवाजी जावीर, तानाजी निकम यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. कारखान्यावर सुमारे ५०० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे केदार नायकवडी म्हणाले. शासन नियमांनुसार संचालकावर प्रत्येकी २६ कोटी ८० लाख रुपयांची जबाबदारी येणार असल्याचा दावा त्यांनी केला. वैभव नायकवडी यांनी स्वतःच्या आर्थिक क्षमतेतून कर्ज फेडून कारखाना कर्जमुक्त करावा व पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी किरण नायकवडी यांनी केली. तर गौरव नायकवडी यांनी मुंबईत वैभव यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या. त्यांना कोणीही दाद दिली नाही. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, असे सांगितले.


















