सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा अहिर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी श्रीमती जयश्री जयवंत अहिर यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या रिक्त पदावर ही निवड करण्यात आली. अध्यक्ष निवडीसाठी प्रादेशिक उपसंचालक तथा अध्यासी अधिकारी युसूफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा झाली. या निवडीमुळे नागनाथअण्णांंची एक इच्छा पूर्ण झाली. आपले निकटचे सहकारी दिवंगत जयवंत अहिर यांना अध्यक्ष करण्याची क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांची इच्छा होती. अहिर यांच्या पत्नी जयश्री अहिर यांची अध्यक्षपदी निवड करून क्रांतिवीर नागनाथअण्णांची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान लाभले आहे, असे किरण नायकवडी यांनी सांगितले.
अध्यक्षपदासाठी जयश्री अहिर यांचा एकमेव अर्ज आला होता. त्याला संचालक तुकाराम डवंग हे सूचक तर संचालक शरद माळी अनुमोदक होते. छाननीनंतर अध्यासी अधिकारी शेख यांनी अहिर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे अधिकारी दिगंबर पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, संचालक सर्वश्री गौरव नायकवडी, अरविंद कदम, बापूसो पाटील, तानाजी निकम, विश्वास थोरात, शिवाजी खामकर, रामचंद्र पाटील, गंगाराम सूर्यवंशी, शरद थोरात, संभाजीराव पाटील, शिवाजी जावीर, लक्ष्मण शिंदे तसेच संचालक विशाखा कदम, वैशाली मोहिते, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, सचिव मुकेश पवार आदी उपस्थित होते. हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, महादेव कांबळे, केदार नायकवडी, रामचंद्र बाबर, शिवाजी अहिर, माणिक कदम, महादेव पाटील, दादा चव्हाण, चंद्रकांत पाटील, अरुण यादव, अॅड. वरुण माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


















