सांगली : येत्या गाळप हंगामात तोडणी वाहतूक यंत्रणा उभारण्यासाठी हुतात्मा साखर कारखान्याला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने तीस कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याची माहिती कारखान्याचे संचालक गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांनी दिली. हे कर्ज मिळण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठे सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, हुतात्मा साखर कारखान्याच्या आगामी गाळप हंगामाची तयारी गतीने सुरू आहे. सगळे संचालक, अधिकारी, कामगार त्यासाठी परिश्रम घेत आहेत. येणाऱ्या गळीत हंगामात प्रतिदिनी किमान साडेचार हजार टन ऊसाचे गाळप होण्याच्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कारखान्याचा शेती विभाग, उस विकास विभाग याबाबत नेटाने काम करत आहेत. येत्या गाळप हंगामात गतवर्षीच्या तुलनेत पन्नास हजार टन ऊसाचे जास्त गाळप होईल. कारखाना गेल्या वीस वर्षांच्या तुलनेत येणाऱ्या हंगामातच आपले अस्तित्व सिद्ध करेल. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यापासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन सुरूच आहे. ज्येष्ठ नेते किरण नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. एका बाजूला आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला कारखान्याच्या आगामी गाळप हंगामाची तयारी अशा दोन्ही बाजूंनी काम सुरू आहे.


















