सांगली : ‘महांकाली’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालकांना नोटीस; सहकार विभागाकडून कारवाई

सांगली : येथील महांकाली साखर कारखाना कर्मचारी सहकारी पतसंस्थेची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी विशेष वसुली अधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलली आहेत. यासंदर्भात कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि इतर सर्व संचालकांना ‘कारण दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना सात दिवसांच्या आत साखर कारखान्याच्या मालकीच्या सर्व स्थावर मालमत्तेचा सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पतसंस्थेची थकबाकी वसुलीची प्रक्रिया सध्या प्रलंबित आहे. या प्रकरणी कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधकांनी २१ मे २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, कारखान्याच्या मालमत्तेतून थकबाकी वसूल करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश कोल्हापूरचे सहनिबंधक यांनी दिले होते. तसेच, कारखान्याची मालमत्ता विकण्यापूर्वी संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेची विक्री करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि नेमकी कोणती मालमत्ता विक्रीसाठी उपलब्ध आहे, याची खात्री करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

निर्धारित सात दिवसांच्या मुदतीत माहिती न दिल्यास किंवा जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिल्यास, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १४९(३) आणि नियम १०७ अंतर्गत कठोर कायदेशीर वसुली कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा विशेष वसुली अधिकाऱ्यांनी दिला आहे. या नोटीसमुळे कारखान्याच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विशेष वसुली अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, संचालकांनी कारखान्याच्या ताब्यात असलेली किंवा त्यांच्या नावे असलेली सर्व स्थावर मालमत्ता, तिचे क्षेत्रफळ, जमिनीचा प्रकार, ७/१२ उतारा, ८-अ उतारा, फेरफार नोंद आणि सध्याचे बाजारमूल्य यांसह इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. याशिवाय, या मालमत्तेवर काही बोजा किंवा न्यायालयीन वाद आहेत का, याचीही सविस्तर माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

विशेष वसुली अधिकारी राजेंद्र माळी यांनी दिलेल्या नोटीसमध्ये महाकालीच्या अध्यक्ष अनिता सगरे, उपाध्यक्ष दीपक ओलेकर, कार्यकारी संचालक मनोज सगरे यांच्यासह अन्य संचालक, मयत संचालकांचे वारसदार यांची नावे आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here