सांगली : यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या गेल्यावेळच्या निवडणुकीत रयत पॅनेलचा धुव्वा उडाल्याने डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सावध भूमिका घेतली आहे. माजी सहकारमंत्री दिवंगत यशवंतराव मोहिते यांनी कराड, वाळवा आणि पलूस, कडेगाव तालुक्याच्या सिमारेषेवर सहकारी तत्वावर कारखान्याची उभारणी केली आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यात रूजवली. आगामी निवडणुकीत रयत पॅनेलचे प्रमुख, कृष्णेचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. सहकार आणि संस्थापक पॅनेलमध्ये होणाऱ्या दुरंगी लढतीमध्ये ज्या पॅनेलची सरशी होईल, त्याच्या पाठीशी राहू, असा स्पष्ट खुलासा त्यांनी केला.
वाळवा तालुक्यात इंद्रजित मोहिते यांचे नेतृत्व मानणारे उरूण ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, सुरेंद्र पाटील, संपतराव पाटील, दिलीपराव मोरे, विवेकानंद मोरे, विकास पाटील, विलास शिंदे, जयवंतराव मोरे, सयाजी पाटील, विक्रमभाऊ पाटील आदी समर्थक डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे डॉ. मोहिते यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत सहभागी होताना रयत पॅनेलच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक घेऊनच निर्णय होईल, असे सांगण्यात आले.


















