सांगली : उसाच्या एफआरपी मापन पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा रघुनाथदादा पाटील यांचा दावा

सांगली : एसएमपीचा कायदा होता तोपर्यंत त्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना साखरेखेरीज तयार होणाऱ्या उपपदार्थांच्या उत्पन्नातील ५० टक्के मोबदला मिळत होता. मात्र तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हा कायदाच बदलून टाकला, शिवाय नवीन एफआरपीचा कायदा करताना साखर उताऱ्याचा बेस देखील ८.५ टक्केवरून १०.२५ टक्के केला आणि खासदारकीसाठी राजू शेट्टी यांनी या बदलाला पाठिंबा दिला. उसाच्या एफआरपी पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. इथेनॉल जरी शंभर रुपये लिटर झाले आणि साखरेचा कितीही दर वाढला तरी, शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणारच नाही. कारण तो द्यायची कायदेशीर तरतूद असणारी सी. रंगराजन समितीची शिफारस कारखानदारांनी मान्य केलेली नाही. आता जरी एफआरपी वाढविली म्हणून सरकार टिमकी वाजवत असले तरी, प्रत्यक्षात बेसच वाढविल्यामुळे एफआरपीचा खरा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

रघुनाथदादा पाटील म्हणाले की, तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे राजू शेट्टी यांनी संगनमताने एसएमपीचा कायदा बदलून एफआरपीचा कायदा केला. परिणामी आता साखर अगदी शंभर रुपये किलो झाली तरी, उसाला एफआरपीइतकाच भाव मिळेल. एसएमपीमध्ये रास्त भाव मिळाला नाही, तर कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद होती. एफआरपीचा कायदा करताना ही तरतूद काढून टाकण्यात आली. यामुळे ऊस दर देणे बंधनकारक असलेल्या कायदेशीर तरतुदीला तिलांजली मिळाली. यामुळे शेतकऱ्यांना साखर कारखानदारांनी एफआरपी दिली तर ठीक, अन्यथा शांत राहण्याची वेळ आली. येत्या हंगामासाठी ३,६५० रुपये एफआरपी १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यातून तोडणी-वाहतूक तसेच अन्य खर्च वजा केले, तर २७०० ते २८०० रुपयेच राहतात. साखरेच्या दातील तेजी तसेच इतर उपपदार्थातील उत्पन्न यातून ७५ टक्के वाटा हा ऊस उत्पादकाला द्यायचा आहे, अशी सी. रंगराजन समितीची शिफारस आहे. मात्र तिची अंमलबजावणी होत नाही.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here