सांगली : श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल अत्यंत अटीतटीच्या वातावरणात बुधवार, दि. ९ सप्टेंबररोजी स्पष्ट झाला. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेतृत्वाखालील व अनिता सगरे यांच्या अध्यक्षतेखालील ‘महांकाली शेतकरी विकास पॅनेल’ने ‘महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीं’च्या पॅनेलवर मात करत सर्वच्या सर्व १७जागांवर निर्णायक आघाडी घेतली. त्यामुळे सगरे गटाने ‘महांकाली’चा गड कायम राखल्याचे चित्र आहे. रात्री उशिरापर्यंत निकालाची औपचारिक घोषणा झाली नव्हती.
बुधवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतमोजणीच्या प्रत्येक फेरीकडे दोन्ही पॅनेलच्या समर्थकांचे लक्ष लागले होते. सुरुवातीच्या फेरीपासूनच महांकाली शेतकरी विकास पॅनेलने सर्व जागांवर आघाडी घेतली आणि रात्री उशिरापर्यंत ही आघाडी भक्कम राहिली. त्यामुळे सगरे गटाच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
या निवडणुकीत एकूण १४ हजार ८७२ मतदारांपैकी ८ हजार ५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता; मतदानाची एकूण टक्केवारी ५४.१८ टक्के नोंदवली गेली होती. मतदानानंतर तीन दिवसांनी झालेल्या या मतमोजणीमुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. महांकाली शेतकरी विकास पॅनेलकडून (सगरे गट) सर्वसाधारण गटातून अनिता विजयकुमार सगरे, दीपक गणपतराव ओलेकर, जीवन वसंतराव भोसले, सुहास शिवाजीराव पाटील, सागर सूर्यकांत पाटील, मोहन निवृत्ती खोत, भीमराव विठ्ठल कोळेकर, प्रकाश पंडित पाटील-बंडगर, संभाजी सर्जेराव पवार, कुमार आप्पासो पाटील, काशिलिंग शामराव कोळेकर, अरविंद सदाशिव स्वामी व दीपक अच्युतराव चव्हाण, महिला गटातून छाया पुंडलिक पाटील व अनुराधा गणपती सगरे, अनुसूचित जाती-जमाती गटातून निखिल संजय बनसोडे, बिगर उत्पादक गटातून शंतनु विजयकुमार सगरे मैदानात होते.
महांकाली शेतकरी विकास पॅनेलवर विश्वास व्यक्त करून आम्हाला भरघोस विजय मिळवून दिल्याबद्दल कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी, कामगार, समर्थक आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. हा विजय कोण्या एका व्यक्तीचा नसून महांकालीच्या सभासदांनी आणि शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे. सभासदांनी आमच्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडू. कारखान्याची प्रगती, शेतक-यांचे हित आणि कामगारांचे प्रश्न यांना सर्वोच्च प्राधान्य देत काम करू. सभासदांचा विश्वास सार्थ ठरवणे हेच आमचे प्रमुख ध्येय राहील. सर्वांना सोबत घेऊन महांकाली कारखाना लवकरात लवकर पुन्हा सुरू करून तो सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे अनिता सगरे यांनी सांगितले.
महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत अटीतटीच्या सत्तासंघर्षात जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा दिला. या लढ्यावर सभासदांनी विश्वास दाखवला. त्यांचा विश्वास आणि त्यांच्या अपेक्षा येणाऱ्या काळात सिद्ध करण्याची जबाबदारी आम्ही सक्षमपणे पार पाडू. कारखाना पुन्हा सुरू करून तालुक्याचे चित्र बदलू, कारखान्याच्या माध्यमातून सभासद, शेतकरी तसेच परिसराचे आर्थिक चित्र बदललेले दिसेल, असे मत जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम यांनी व्यक्त केले.


















