सांगली : सोनहिरा सहकारी साखर कारखान्यातर्फे कार्यक्षेत्रातील गळीत हंगाम २०२५-२६ मधील विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. शनिवारी (ता. १९) अधिमंडळाच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी दिली. आडसाली हंगामासाठी दिनकर व्यंकू महाडिक (चिंचणी), दीपक मनोहर शिंदे (देवराष्ट्रे), विनायक प्रल्हाद कदम (उपाळे मायणी), सुरू हंगामासाठी लक्ष्मण बाबूराव पोळ (सासपडे), अरुण शंकर मांडके (शिरसगाव), भगवान महादेव नांगरे (विहापूर) तसेच खोडवा पिकासाठी बबन दादू महाडिक (खेराडे विटा) या ऊस उत्पादकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मोहनराव कदम म्हणाले की, कारखान्यातर्फे प्रथम क्रमांकाकरिता रक्कम रु.२५,००० व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाकरिता रक्कम रु.१५,००० व सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांकाकरिता रक्कम रु.१०,००० व सन्मानचिन्ह या स्वरुपात पुरस्कार वितरण केले जाणार आहे. संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचे नावाने कारखान्यामार्फत दरवर्षी पुरस्कार दिले जातात. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकरी ऊस उत्पादन वाढावे, या उद्देशाने आमदार विश्वजित कदम यांच्या संकल्पनेतून ऊस पिक स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित केली जाते. सहभागी शेतकऱ्यांमधून ज्यांचे ऊस टनेज एकरी जास्त आले आहे, तसेच पुरस्काराच्या अनुषंगाने सर्व अटींचे पालन केलेल्या शेतकऱ्यांना डॉ. पतंगराव कदम ऊसभूषण पुरस्कार, सन्मान चिन्ह व रोख रक्कम या स्वरुपात गौरवण्यात येणार आहे. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक एस. एल. देसाई उपस्थित होते.


















