सांगली : साखरेची एमएसपी ५० रुपये करण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी, शेतकऱ्यांना ऊस तोडणी थांबवण्याचे आवाहन

सांगली : मागील वर्षीचा साखर साठा संपलेला आहे. दसरा-दीपावली सण तोंडावर आहे. कारखाने लवकर सुरू केल्याशिवाय केंद्र सरकारला पर्याय नाही, अन्यथा साखरेचे दर शंभर रुपयांवर जातील. यावर्षी लवकर कारखाने सुरू झाले तर सध्या साखरेचा उतारा ८ टकक्यांहून कमी आहे. याचा फटका शेतकऱ्यासह कारखानदारांनाही बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नयेत, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. सांगली जिल्ह्यातील बावची येथे संघटनेची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रती किलो ५० रुपये आणि उसाची एफआरपी ५५०० रुपये करण्यात यावी अशी आग्रही मागणी शेट्टी यांनी यावेळी केली.

शेट्टी म्हणाले की, आतापर्यंत आम्ही कारखानदारांविरोधात भांडत होतो. यावर्षी जाणाऱ्या उसाला पाच हजार पाचशे रुपये दर मिळावा, पाचशे रुपये प्रतिटन अनुदान मिळावे, सी हेवी इथेनॉलचा दर ७० रुपये प्रतिलिटर करावा या मागण्या मान्य झाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही. साखर टंचाईमुळे पहिल्यांदाच केंद्र सरकारची मानगुट आमच्या हातात सापडली आहे. शेतकऱ्यांनो, थोडी कळ सोसा. उसाच्या तोडण्या घेऊ नका. उसाला साडेपाच हजार दर निश्चित मिळणार आहे. बावची परिसरातून उद्यापासून एक कांडंसुद्धा ऊस कोणत्याही कारखान्याला तोडून न देण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल पवार, प्रवक्ते एस. यू. संदे, जिल्हाध्यक्ष विश्वास कोळी, तालुकाध्यक्ष जगन्नाथ भोसले, सूर्यभान जाधव, बाबा सांद्रे, संदीप राजोबा, भागवत जाधव, गणी मुल्ला, सचिन यादव उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here