सांगली : यंदाच्या गळीत हंगामामध्ये उसाला पहिली उचल साडेचार हजार रुपये प्रतिटन देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. मात्र, साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर न करताच कारखाने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने शेतकऱ्यांत नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक होत असून, वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यांतील ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जिल्ह्यात उसाला पहिली उचल प्रतिटन साडेचार हजार रुपये मिळावी,’ या मागणीवरून जिल्ह्यात चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. नांद्रे-खोतवाडी मार्गावर उसाची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर रस्त्यावर पेटवून देण्यात आले. त्यात एक ट्रॅक्टर जळून खाक झाला. अज्ञात व्यक्तींनी ही कृत्य केल्याचे सांगण्यात येते.
सोमवारी आरग येथे मोहनराव शिंदे कारखान्याकडे जाणारा ट्रॅक्टर पेटविण्यात आला होता. त्यानंतर आज नांद्रे-खोतवाडी मार्गावर उसाची वाहतूक करणारे उसाने भरलेले ट्रॅक्टर रस्त्यावर पेटवून देण्यात आले. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून आंदोलनाची ठिणगी पडली असताना प्रशासन आणि कारखानदारांकडून ऊसदराबाबत कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. तर ऊसतोडणी आणि वाहतूकदारांनी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. ऊस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भडका कायम राहिला असून सरकारच्या स्तरावर याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याचे दिसून येत आहे.

















