सातारा : किसन वीर आणि खंडाळा साखर कारखान्यांकडे २०२५-२६ मध्ये गळितासाठी आलेल्या अनक्रमे ४ लाख ५३ हजार ६५६ मे. टन व २ लाख ४५ हजार २८० मे. टनाची ३३५० रूपयांप्रमाणे होणारी एफआरपीची २३४ कोटी १४ लाख ३८ हजार ५३४ रूपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली आहे. कारखान्याने यापूर्वीच १५ जानेवारी अखेर गळितास आलेल्या ऊसाची संपूर्ण एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना आदा केलेली होती. आता दि. १६ जानेवारी ते ७फेब्रवारीअखेर गळितासाठी आलेल्या ऊसाच्या बीलाची रक्कम २५ कोटी ९४लाख ८५ हजार ५७१ रूपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मागील चार सिझनमध्ये कोणत्याही बँकेचे सहाय्य न घेता शेतकऱ्यांची सर्व बिले अदा केली आहेत. कारखान्याने मागील चारही वर्षात एफआरपीची संपूर्ण रक्कम दिलेली असून सन २०२०-२१ मधील थकीत ६४ कोटीची ऊस बीलेही दिल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली आहे. मागील सिझनमध्ये किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने पुर्ण क्षमतेने सुरू होते. सन २०२६-२७ या गळित हंगामाची तयारीही सुरू असून येणारा सिझनही पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आम्ही सज्ज आहे. तसेच काही लोकांकडून कारखान्याविषयी जाणिवपुर्वक बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू आहे. शेतकऱ्यांनी कटकारस्थानाला बळी पडू नये, असे आवाहन व्हा. चेअरमन प्रमोद शिंदे व कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले आहे.


















