सातारा : महाराष्ट्रातील अनेक अडचणीत आलेले साखर कारखाने सहकारी तत्त्वावर यशस्वीपणे उभे राहिले आहेत. मात्र, श्रीराम कारखान्याच्या बाबतीत तसे प्रयत्न झाले नाहीत. श्रीराम कारखान्याच्या भागीदारी कराराला निम्म्याहून अधिक सभासदांचा विरोध होता. प्रशासकांनी कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याऐवजी तो सातत्याने भाडेतत्त्वावर चालविण्याचा मार्ग स्वीकारला. आता पडद्यामागून हालचाली करून कारखाना खासगी कंपनीकडे देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा कारखाना खासगी तत्त्वावर चालवण्यासाठी देऊ नये. तो सहकारी तत्त्वावरच चालवावा, अशी भूमिका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मांडली.
फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, श्रीराम कारखान्याच्या आगामी गळीत हंगामावर कोणताही स्थगिती आदेश नाही. विद्यमान व्यवस्थापनाने कारखाना स्वतः चालवून दाखवावा किंवा राज्यातील अन्य सहकारी साखर कारखान्यांच्या सहकार्याने तो सुरू करावा, असे त्यांनी नमूद केले. शेतकरी, सभासद आणि कामगारांचे हित जपण्यासाठी कोणत्याही स्तरावर चर्चेस आम्ही तयार आहोत. भागीदारी तत्त्वावर कारखाना दुसऱ्याला चालवण्यास दिल्यानंतर मूळ सभासदांचे अधिकार कमी होतात. कारखाना सक्षमपणे चालवला जाईल, अशी सभासदांची अपेक्षा होती. मात्र तसे न होणे ही चिंतेची बाब आहे. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, विश्वासराव भोसले, नरसिंह निकम, माणिकराव सोनवलकर, विक्रमसिंह भोसले, अमित रणवरे, विलास नलवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


















