सातारा : जिल्ह्यात २ हजार ८७९ कोटींची एफआरपी अदा, कारखानदारांनी थकवले शेतकऱ्यांचे ५४३ कोटी

सातारा : साखर आयुक्तालयाकडील गळीत हंगाम २०२५-२६ मधील १५ मार्च २०२६ पर्यंतच्या एफआरपी अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी या गाळपावर आधारित मूळ एफआरपी देयक ३ हजार ४२२ कोटी ९२ लाख ८६ हजार इतके होते. त्यापैकी कारखान्यांनी मूळ एफआरपीपोटी २८७९ कोटी १३ लाख ७५ हजार रुपये अदा केले आहेत. काही कारखान्यांनी १०० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त एफआरपी अदा केली असली तरी अनेक कारखान्यांकडे मोठी थकबाकी आहे. जिल्ह्यातील साखर सम्राटांनी शेतकऱ्यांचे तब्बल ५४३ कोटी ७९ लाख १३ हजार रुपये थकवले आहेत. हंगाम संपून आता दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, तरीही अनेक कारखान्यांनी पूर्ण एफआरपी अदा केलेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ऊस बिले थकवली असली तरी चार कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. तर काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा काही जास्त रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. खटाव-माण कारखान्याने २८६९, श्रीरामने ३०१०, शरयूने २७८१ आणि दत्त इंडियाने ३०५६ असा दर दिला आहे. त्यामुळे कागदावर जरी जास्त पैसे दिसत असले तरी प्रत्यक्षातील दर हा कमीच राहिला असल्याचे दिसते. खटाव – माण कारखान्याने १७ कोटी ७० लाख १५ हजार रुपये, श्रीराम कारखान्याने ८ कोटी ८० लाख रुपये, शरयू कारखान्याने ४ कोटी २४ लाख २७ हजार रुपये, दत्त इंडियाने १२ कोटी २ लाख ३५ हजार रुपये अधिक दिले आहेत. आता साखर आयुक्तांनी कारखानदारांना नोटिसा बजावून पूर्ण एफआरपी देण्याची मागणी केली जात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here