सातारा : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने येत्या ऊस गळीत हंगामादरम्यान, साखर कारखाना परिसरातील अंगणवाड्यांची वेळ बदलण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याला यश आले आहे. त्यानुसार यावर्षीपासून ऊसतोड हंगामावेळी कारखाना परिसरातील अंगणवाड्यांची वेळ दुपारी १२ ते सायंकाळी साडेसहा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे कामगार आणि मुलांनाही दिलासा मिळालेला आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. विशेषतः ऊसतोड कामगारांच्या मुलांना अंगणवाडीत शिकता यावे, शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यात एकूण १७ सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांच्या परिसरातील अंगणवाड्यांमध्ये ऊसतोड मजुरांची मुले जातात. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे यांनी सांगितले की, ऊसतोड कामगारांच्या मुलांनाही अंगणवाडी सेवांचा लाभ मिळावा, हीच मुख्य भूमिका होती. यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत ठराव घेऊन पाठपुरावा करण्यात आला. याला यश आले आहे. राज्य शासनाने अंगणवाडीच्या वेळेत बदल केला आहे. ऊसतोडीच्या हंगामात मुलांची शाळा बुडणार नाही. मे महिन्यात झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत अंगणवाडी वेळेत बदल करण्याचा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला होता. ठरावानंतर जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची दखल घेत शासनाने केवळ ऊसतोड हंगामापुरती दुपारी १२ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत अंगणवाड्या सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही.


















