सातारा : मंत्री मकरंद पाटील व खा. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किसन वीर व खंडाळा कारखान्याचे गाळप व्यवस्थित सुरू असून को-जनरेशन प्लांट व डिस्टिलरी प्रकल्पात उत्पादन सुरू झाले आहे. मकरंद पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांना अडचण येऊ नये, याकरिता त्यांना सोयीच्या ठिकाणी साखर वाटपाचे नियोजन ७ नोव्हेंबरपर्यंत करण्यात आले होते. मात्र, काही सभासदांना वैयक्तिक अडचणींमुळे साखर उचलता आली नव्हती. त्यामुळे साखर वाटपास मुदत वाढ देण्यात आली आहे. सभासदांच्या अडचणी लक्षात घेऊन साखर वाटपाला १४ नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली आहे.
याबाबत कारखान्याच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दिवाळीनिमित्त किसन वीर व खंडाळा साखर कारखान्याच्या सभासद व बिगर सभासदांना ७ नोव्हेंबरपर्यंत साखर वाटप करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, काही सभासदांना विविध अडचणंमुळे ही साखर घेता आली नाही. ज्या सभासद व बिगर सभासदांनी आपली दिवाळीची साखर अद्यापही नेलेली नाही, त्यांच्याकरिता दि. १२ ते दि. १४ नोव्हेंबरपर्यंत साखर वाटपाचा निर्णय झाला आहे. ज्या सभासदांची साखर राहिलेली आहे, त्यांनी किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यस्थळावरून कारखान्यांच्या वेळेत साखर घेऊन जावी असे शिंदे यांनी म्हटले आहे. सर्व ऊस उत्पादकांनी आपला ऊस किसन वीर व खंडाळा साखर कारखान्यास गाळपासाठी घालावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.


















