सातारा : कामगारांचे थकीत वेतन प्रकरणी ‘किसन वीर’ला कामगार आयुक्तांकडून तीन ऑगस्टची मुदत

सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत पगार आणि विविध घोटाळ्यांच्या विरोधात भूमिपुत्र संघटना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. कामगारांच्या कोट्यवधींच्या थकीत पगारप्रकरणी काल पुणे येथील कामगार आयुक्तांसमोर सुनावणी झाली. तपास अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी अदिती वालावलकर यांच्या समोर काल कामगार आयुक्त कार्यालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बाबर यांनी कामगारांची बाजू मांडताना सद्यस्थिती मांडली. त्यावर कारखान्याचे प्रतिनिधी व वकिलांनी उत्तरासाठी मुदत मागितली असून, पुढील सुनावणी तीन ऑगस्टला होणार असल्याचे बाबर यांनी सांगितले.

भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष बाबर यांनी सांगितले की, कामगार अधिकाऱ्यांनी सुनावणीदरम्यान, कारखान्याकडे कामगारांच्या थकीत वेतनासाठी विचारणा केली. थकीत पगार, रिटेन्शन भत्ता, पीएफ, एलआयसी, कामगार कल्याण मंडळ निधी घोटाळा आणि पगार फरक या सर्व मुद्द्यांवर पुराव्यांसह चर्चा झाली. तपास अधिकाऱ्यांनी कारखाना प्रतिनिधींना विचारणा केली तेव्हा कारखान्याचे वकील अॅड. एम. आर. जाधव आणि लेबर ऑफिसर अरविंद शिंगटे यांनी उत्तर देण्यासाठी मुदत मागितली. तपास अधिकारी अदिती वालावलकर यांनी कारखाना प्रशासनाला आणि उपस्थित प्रतिनिधींना कडक शब्दांत जाब विचारला आहे. कामगारांच्या हक्काचे पैसे लाटणाऱ्या व्यवस्थापनाला कोर्ट-कचेऱ्यांच्या पायऱ्या चढायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अवधूत निकम आणि नितीन बर्गे यांचेही सहकार्य लाभले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here