सातारा : दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यावेळी कारखान्याचे सध्याचे सुमारे दोन लाख मेट्रिक टनांपर्यंतचे ऊस गाळप आगामी काळात तीन लाख मेट्रिक टनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे असल्याची घोषणा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. सभेत कारखान्याची आर्थिक स्थिती, ऊस उपलब्धता, गाळपवाढ आणि सभासदांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कारखान्याने सभासदांच्या हितासाठी एफआरपीची पूर्तता करण्यासाठी कर्ज घेतले आहे. त्यामुळे भविष्यात उत्पादन खर्च कमी करून आर्थिक शिस्त राखणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, कारखान्याच्यावतीने आता कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाण्याचे प्रमाण कमी करण्यासोबतच ऊस क्षेत्रवाढ आणि उत्पादन खर्चावर नियंत्रण या बाबींवर भर देण्यात येणार आहे. सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, कारखान्याच्या हितासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ३५ टक्के ऊस अन्यत्र जात असल्याची बाब चिंतेची असल्याचे सांगत ना. देसाई यांनी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला दिल्यास गाळप वाढण्याबरोबरच कारखान्याची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होईल. सभेला कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, रवीराज देसाई, आदित्यराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, अशोकराव पाटील, उपसभापती विजय पवार, बाळासाहेब पाटील, अॅड. मिलिंद पाटील, अॅड. डी. पी. जाधव, अॅड. बाबुराव नांगरे, शशिकांत निकम, प्रशांत पाटील, सुनील पानस्कर, बशीर खोंदू, अभिजित पाटील, चंद्रकांत पाटील, सूरज चव्हाण, विजय जंबुरे, कार्यकारी संचालक प्रदीप यादव यांच्यासह पदाधिकारी, सभासद व हितचिंतक उपस्थित होते.


















