सातारा : सह्याद्री साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ७५०० मेट्रिक टनावरून वाढवून ११,००० मेट्रिक टन करण्याचा विस्तारवाढ प्रकल्प गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये यशस्वी झाला. आता आगामी गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्याच्या वाढीव दैनंदिन गाळप क्षमतेला पुरेल इतक्या उसाची आवक करण्यासाठी तोडणी वाहतूक यंत्रणा सक्षम करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या अनुषंगाने कारखान्याच्या श्रोत्रेवाडी विभागीय शेती कार्यालयांतर्गत सुपने व तांबवे विभागातील कार्यक्षेत्रातील गावांमधील ऊस तोडणी वाहन मालक आणि वाहतूक कंत्राटदारांची बैठक राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. वाढीव गाळप क्षमता लक्षात घेता पुढील हंगामासाठी सक्षम ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे. स्थानिक पातळीवर टोळ्या तयार करून जास्तीत जास्त वाहनांची नोंदणी व करार करा, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
या बैठकीत कंत्राटदार व वाहन मालकांच्या अडीअडचणी जाणून घेत मार्गदर्शन करण्यात आले. ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व वाहन मालकांना कारखान्याकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती देण्यात आली. स्थानिक पातळीवर ऊस तोडणी टोळ्या व वाहतूक यंत्रणा उभाराव्यात, ऊस वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहने कारखान्याकडे नोंदवावीत, करार प्रक्रियेचे काम कारखाना कार्यस्थळी सुरू असून जास्तीत जास्त करार करण्यात यावेत अशी सूचना करण्यात आली. कारखान्याचे संचालक आण्णासाहेब पाटील, संभाजी साळवे, भानुदास कदम, भाऊसो फडतरे, संतोष चव्हाण, बाजीराव पवार, महादेव टोळे, अधिकराव पाटील, प्रकाश माळी, प्रकाश कदम, शिवाजी गाडवे, प्रदीप शिंदे, सतीश पाटील, राजेंद्र पाटील, हणमंत पवार आदींची भाषणे झाली. मारुती निकम, सुहास जाधव यांच्यासह कारखान्याचे शेती अधिकारी वसंतराव चव्हाण, उपशेती अधिकारी नितीन साळुंखे आदी उपस्थित होते.


















