सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष आणि संचालक मंडळाने सभा घाईघाईत गुंडाळली. मी सभासदांसोबत उपस्थित राहिलो होतो. कारखान्यावर तब्बल ८०० कोटी रुपयांचे कर्ज नेमके कसे झाले, सभासदांना पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मोफत साखर का दिली जात नाही, साखरेचा दर थेट पंधरा रुपये का करण्यात आला, मृत सभासदांच्या वारस नोंदी करून त्यांच्या नावावरील शेअर्स वर्ग का केले जात नाहीत? असे कारभारावर बोट ठेवणारे सवाल आम्ही उपस्थित केले. मात्र, या प्रश्नांना उत्तरे देणे शक्य नसल्याने सत्ताधाऱ्यांनी सभा रेटून नेण्याचा प्रयत्न केला. या मनमानी कारभाराविरोधात सहकार आयुक्त आणि सहकारमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे आमदार घोरपडे यांनी सांगितले.
आमदार घोरपडे म्हणाले की, शेतकरी किंवा सभासदांनी कारभाराविषयी प्रश्न विचारले की अध्यक्ष कायम माईक बंद करून आवाज दाबतात, ही परंपरा या सभेतही कायम ठेवण्यात आली. आम्ही भूमिका मांडण्यासाठी माईक मागितला असता तो बंद करण्यात आला. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी अजितदादा पवार यांना आदरांजलीच्या वेळी विरोधकांनी दंगा केल्याचा कांगावा सत्ताधारी करत आहेत. सभासदांनी कारखाना उभारणीसाठी स्वतः कर्ज काढून शेअर्सची रक्कम भरलेली आहे. त्यामुळे त्या शेअर्सच्या व्याजापोटी मिळणारी साखर हा सभासदांचा हक्क आहे, ते कोणाचेही उपकार नाहीत. ऊस घातला नाही म्हणून सभासदांची साखर बंद करणे पूर्णपणे चुकीचे आहे. मग ज्या बिगर सभासदांनी कारखान्याला ऊस घातला, त्यांना तरी कारखाना साखर देतो का? असा सवाल आमदार घोरपडे यांनी केला.


















