सातारा : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२६-२७ साठी ऊस तोडणी व वाहतूक करारांना कारखान्याचे चेअरमन तथा माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यंदाच्या हंगामासाठी सुमारे २३ हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली असून, संपूर्ण ऊस गळीत करण्यासाठी सक्षम तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारण्यावर भर दिला जात आहे.
या या करार प्रक्रियेचा शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे, शेती अधिकारी वसंतराव चव्हाण तसेच कंत्राटदार, वाहन मालक व कर्मचारी उपस्थित होते. कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये दैनंदिन गाळप क्षमता ७५०० मे. टनांवरून ११००० मे. टनांपर्यंत वाढविणारा विस्तार प्रकल्प यशस्वीरीत्या राबविला आहे. त्यामुळे उसाची उपलब्धता वाढणार आहे. हे गृहित धरून बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रक तसेच ऊसतोडणी मशीन मालकांशी करार करण्यात येत आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उसाची नोंद कारखान्याकडे करावी आणि तोडणी, वाहतुकदारांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

















