SEIA 2026 : बारामती ॲग्रो लिमिटेडला ऊस क्षेत्रातील एआय-आधारित डिजिटल परिवर्तन उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

मुंबई : साखर, इथेनॉल आणि जैवऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित शुगर, इथेनॉल अँड बायोएनर्जी इंटरनॅशनल अवॉर्ड्स (SEIA) 2026 चा भव्य समारोप मुंबईतील पवई येथील द वेस्टिन हॉटेलमध्ये पार पडला. हा पुरस्कार सोहळा शुगर-इथेनॉल अँड बायोएनर्जी इंडिया कॉन्फरन्स (SEIC 2026) च्या पाचव्या आवृत्तीचे प्रमुख आकर्षण ठरला. या परिषदेचे आयोजन 12 आणि 13 जून 2026 रोजी करण्यात आले होते.

परिषदेची सुरुवात उद्योग, शासन आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी साखर, इथेनॉल आणि जैवऊर्जा उद्योगाशी संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सहभाग घेत उद्योगाचे भविष्य, आव्हाने आणि संधी यावर सखोल चर्चा केली. पुरस्कार वितरण सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान यांच्या हस्ते बारामती ॲग्रो लिमिटेड यांना ऊस क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या माध्यमातून डिजिटल परिवर्तनामधील उत्कृष्टता (Excellence in Digital Transformation through AI in Sugarcane Field) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एआय आधारित डिजिटल‘बारामती ॲग्रो’कडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर…

ChiniMandi WhatsApp Channel

ऊस शेती आणि व्यवस्थापनामध्ये आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर केल्याबद्दल बारामती अॅग्रो लिमिटेडला हा सन्मान प्रदान करण्यात आला. कंपनीने एआय-आधारित उपाययोजनांचा अवलंब करून ऊस उत्पादन, पिकांचे निरीक्षण, माहितीचे विश्लेषण आणि कृषी व्यवस्थापन अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि परिणामकारक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. SEIA 2026 पुरस्कारांचा उद्देश नवोपक्रम, तांत्रिक प्रगती आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून साखर आणि जैवऊर्जा उद्योगाला नवी दिशा देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना गौरविणे हा आहे. यंदाचा कार्यक्रम उद्योगातील आघाडीचे तज्ज्ञ, उद्योजक, धोरणकर्ते आणि तांत्रिक व्यावसायिक यांच्यासाठी विचारांची देवाणघेवाण, नव्या संधींचा शोध आणि परस्पर सहकार्य वाढविणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले.

देशभरातील साखर उद्योगातील दिग्गजांची उपस्थिती…

या परिषदेत देशभरातील साखर उद्योग, इथेनॉल उत्पादन, जैवऊर्जा आणि कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक नामवंत व्यक्तींनी सहभाग घेतला. यामध्ये ‘चिनीमंडी’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उप्पल शाह, सहसंस्थापक हेमंत शाह, जे. के. ग्रुपचे संस्थापक जितू शाह, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे (DFPD) संयुक्त सचिव अश्विनी श्रीवास्तव, महाराष्ट्राचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, श्री रेणुका शुगर्स लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष अतुल चतुर्वेदी, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (NFCSF) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग तज्ज्ञ उपस्थित होते. याशिवाय श्री रेणुका शुगर्सचे कार्यकारी संचालक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजेंद्र सिंह, संचालक रवी गुप्ता, ओंकार ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे-पाटील तसेच ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महावाणिज्यदूत जोसे माउरो दा फोन्सेका कोस्टा कुटो यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

विविध श्रेणींतील उत्कृष्टतेचा गौरव…

SEIA 2026 पुरस्कारांद्वारे साखर, इथेनॉल आणि जैवऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या संस्था आणि व्यक्तींना विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले.

पुरस्कारांच्या प्रमुख श्रेणींमध्ये : खासगी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना, सर्वाधिक विविधीकृत साखर समूह, जैवइंधन व्यापारातील उदयोन्मुख स्टार्टअप, लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ऊस उत्पादक, नवोपक्रम आणि तांत्रिक उत्कृष्टता पुरस्कार, उद्योग नेतृत्व सन्मान आदीचा समावेश होता. या पुरस्कारांद्वारे नवोपक्रम, नेतृत्व, तांत्रिक विकास आणि शाश्वत प्रगतीच्या माध्यमातून उद्योगाला नवी दिशा देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात आला.

नवोपक्रम, शाश्वतता आणि विकासावर विशेष भर…

SEIA 2026 हा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नव्हता, तर साखर, इथेनॉल आणि जैवऊर्जा क्षेत्रातील नवोपक्रम, पर्यावरणीय शाश्वतता आणि औद्योगिक विकासासाठी असलेल्या सामूहिक बांधिलकीचे प्रतीक होता. या व्यासपीठामुळे उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि तांत्रिक तज्ज्ञांना एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करण्याची, नवीन भागीदारी निर्माण करण्याची आणि भविष्यातील व्यावसायिक संधींचा शोध घेण्याची संधी मिळाली. तज्ज्ञांच्या मते, इथेनॉल मिश्रण कार्यक्रम, हरित ऊर्जा आणि जैवइंधनाचे वाढते महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारच्या परिषदांमुळे उद्योगाला नवी दिशा आणि गती मिळत आहे.

SEIA 2026 परिषदेत अग्रगण्य कंपन्यांचा सहभाग…

SEIA 2026 परिषदेत भारतातील अनेक अग्रगण्य आणि नाविन्यपूर्ण कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये निराणी शुगर्स, केबीके केम-इंजिनिअरिंग, रिका ग्लोबल इम्पेक्स, ओंकार साखर प्रायव्हेट लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज, फ्युएलब्रेन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नूर एन्झाइम्स प्रायव्हेट लिमिटेड, अल्फा लावल, आदित्य फिनकेम प्रायव्हेट लिमिटेड, फाइंडॅबिलिटी सायन्सेस इंक., निजामुद्दीन ग्रुप, श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड, श्री विठ्ठल एसएसके, स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्यूल, बलरामपूर चिनी मिल्स आणि बिझनेस कोअर सोल्यूशन्स यांसारख्या कंपन्यांचा समावेश होता.

उद्योगासाठी प्रेरणादायी ठरला SEIA 2026…

SEIA 2026 चा प्रभाव आगामी काळातही साखर, इथेनॉल आणि जैवऊर्जा उद्योगावर जाणवणार आहे, असे मत आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांच्या यशोगाथा इतर उद्योजक, शेतकरी आणि उद्योगाशी संबंधित घटकांना उत्कृष्टतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतील. हा सोहळा केवळ भूतकाळातील यशाचा गौरव नव्हता, तर भविष्यातील नवोपक्रम, तांत्रिक प्रगती आणि उद्योगाच्या नव्या संधींसाठी एक मजबूत पाया ठरला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here