नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत भारताचे सर्वाधिक काळ अखंडपणे सेवा देणारे पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यानिमित्ताने त्यांनी जनसेवेलाच सुशासनाची सर्वात मोठी कसोटी असल्याचे म्हटले आहे. बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर संस्कृत श्लोक शेअर करत पंतप्रधान मोदी यांनी नम्रता, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांच्या माध्यमातूनच जनतेचा विश्वास संपादन करता येतो, असे सांगितले.आपल्या संदेशात त्यांनी म्हटले, “जनसेवाच सुशासनाची सर्वात मोठी परीक्षा आहे. जो व्यक्ती सातत्याने नम्रता, समर्पण आणि कर्तव्यभावनेने कार्य करतो, तोच जनतेचा विश्वास जिंकतो.”
यासोबतच त्यांनी संस्कृतमधील एक श्लोकही पोस्ट केला. त्याचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, जो शासक नेहमी प्रजेच्या हितासाठी कार्यरत असतो आणि विनम्र स्वभाव राखतो, तो अधिक यश व समृद्धी प्राप्त करतो. पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 दिवस पंतप्रधानपद भूषवून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4,398 दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे. यामुळे ते भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ अखंडपणे सेवा देणारे पंतप्रधान ठरले आहेत.
या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या नेत्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाला स्वातंत्र्यानंतरच्या भारतासाठी महत्त्वपूर्ण कालखंड असे संबोधले. त्यांनी जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यात आणि भारताला “लोकशाहीची जननी” म्हणून सादर करण्यात मोदी यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही मोदी यांचे अभिनंदन करत ही कामगिरी कोट्यवधी भारतीयांच्या प्रेम, विश्वास आणि पाठिंब्याचे प्रतीक असल्याचे म्हटले. तसेच आत्मनिर्भर, समृद्ध आणि विकसित भारताच्या उभारणीतील हा एक सुवर्ण अध्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनीही मोदी यांचे अभिनंदन केले आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनीही मोदी यांच्या दीर्घ सार्वजनिक सेवेला आणि नेतृत्वाला ही उपलब्धी समर्पित असल्याचे म्हटले आहे.

















