सोलापूर : सिद्धेश्वर कारखान्याकडे ३० कोटींची ऊस बिले थकीत, शेतकऱ्यांनी ठोकले कार्यालयाला टाळे

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडील २०२५-२६ गळीत हंगामातील थकीत ऊस बिल मिळावे, या मागणीसाठी दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तसेच इतर तालुक्यांतील ४० ते ५० शेतकऱ्यांनी मंगळवारी होटगी येथील कारखान्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सकाळी १० वाजल्यापासून शेतकरी कार्यालयात बसून होते. शेतकऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. डिसेंबर २०२५ तसेच २०२६ मधील ऊस बिल अद्याप मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाच्या अहवालानुसार, कारखान्याकडे चालू हंगामातील शेतकऱ्यांची ३० कोटी ४४ लाख रुपये रक्कम थकीत आहे. अखेर २८ ऑगस्टपर्यंत थकीत ऊस बिले देण्याचे आश्वासन प्रसासनाने दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.

आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबूराव बिराजदार व निरीक्षक अशोक तरंगे यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. थकीत ऊस बिलांबाबत मंगळवारी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास शेतकरी आणि कारखान्याचे एमडी, मुख्य लेखापाल व सचिव यांच्यात बैठक झाली. त्यात थकीत ऊस बिलाबाबत चर्चा झाली. २८ ऑगस्टपर्यंत थकीत ऊस बिल देण्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. २८ ऑगस्ट रोजी बिल न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. शेतकरी अशोक काळे, स्वप्निल जाधव, गंगाधर कोळी, सिदामय्या माळी, शशिकांत पाटील, व्यंकट सलगर, बनसिध्द कुलकर्णी, सर्जेराव काळे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here