सोलापूर : करमाळा तालुक्यातील शेलगाव-भाळवणी येथील आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर ओंकार ग्रुपच्या ताब्यात गेला आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) राबविलेल्या लिलाव प्रक्रियेला आव्हान देत आदिनाथ कारखाना, कामगार आणि बारामती अॅग्रो यांनी पुणे येथील कर्जवसुली न्यायाधिकरणात दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले. त्यामुळे कारखान्याचा ताबा ओंकार ग्रुपकडे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आदिनाथ साखर कारखाना गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. विविध बँकांचे कर्ज थकीत असल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती गंभीर बनली होती. सुमारे दहा वर्षांपूर्वी कारखान्याने एनसीडीसीकडून २५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचे हप्ते थकल्याने व्याजासह थकीत रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली. एनसीडीसी तसेच राज्य सहकारी बँकेच्या कर्जाची परतफेड न झाल्याने कारखान्याची मालमत्ता जप्त करून तिच्या विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
दीड वर्षांपूर्वी कारखाना आमदार नारायण पाटील यांच्या गटाच्या ताब्यात
सुमारे दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत आदिनाथ कारखाना आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या ताब्यात आला. त्यानंतर कारखान्याला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संचालक मंडळाने विविध पातळ्यांवर प्रयत्न केले. मात्र, अपेक्षित आर्थिक मदत उपलब्ध न झाल्याने एनसीडीसीने कारखान्याच्या विक्रीची प्रक्रिया पुढे रेटली. या लिलाव प्रक्रियेला आदिनाथ कारखाना, कामगार आणि बारामती अॅग्रो यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, एनसीडीसीच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आणि आदिनाथ कारखाना ओंकार ग्रुपच्या ताब्यात गेला.
पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करू : ओंकार ग्रुप चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील
ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी सांगितले की, यापूर्वीही ओंकार ग्रुपने आर्थिक अडचणीत सापडलेले साखर कारखाने ताब्यात घेऊन त्यांचे यशस्वी पुनरुज्जीवन केले आहे. त्याच धर्तीवर आदिनाथ कारखानाही पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील शेतकरी, कामगार आणि व्यापाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उच्च न्यायालयात दाद मागणार : नारायण पाटील
आमदार नारायण पाटील म्हणाले की, आदिनाथ कारखाना मोठ्या आर्थिक अडचणीत असल्याची पूर्ण कल्पना असूनही तो पुन्हा सुरू करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले होते. दीड वर्षापूर्वी कारखाना आमच्या गटाच्या ताब्यात आल्यानंतर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संचालक मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न केले. पुणे येथील कर्जवसुली न्यायाधिकरणाने कारखान्याच्या विरोधात निर्णय दिला आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊन पुढील कायदेशीर लढाई लढणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
















