सोलापूर : ऊस तोड मुकादमांकडून वाहनधारकांची दरवर्षी २०० कोटी रुपयांहून अधिक लूट

सोलापूर : ऊस तोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली राज्यातील वाहन मालकांची दरवर्षी २०० कोटी रुपयांहून अधिक फसवणूक होत असल्याचा आरोप सावकारग्रस्त शेतकरी समितीचे जिल्हाध्यक्ष कांतिलाल नाईकनवरे यांनी केला आहे. याप्रश्नी १३ एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पंढरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाईकनवरे बोलत होते. यावेळी फसवणूक झालेले वाहनधारक श्रीमंत गुरसाळे आणि महादेव सलगर उपस्थित होते.

नाईकनवरे म्हणाले, की सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या मोठी आहे. ऊस तोडीसाठी कारखानदार वाहन मालकांशी करार करतात.हे वाहन मालक मजुरांसाठी विविध भागांतील मुकादमांशी संपर्क साधून करार करतात. मजूर वेळेत मिळावेत, यासाठी मुकादमांना कामापूर्वीच लाखो रुपयांची उचल (ॲडव्हान्स) दिली जाते. मात्र अनेकदा हे मुकादम मजूरही पुरवत नाहीत आणि घेतलेली रक्कमही परत न करता लंपास होतात. वाहनधारक तक्रार घेऊन गेल्यावर पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात.

ChiniMandi WhatsApp Channel

मुकादमांना कायद्याची भीती उरलेली नाही, कारण नोटरी करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट, वाहनधारकाने स्वतःचे पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास, स्थानिक भागातील पोलिस तत्परतेने वाहनधारकांवरच गुन्हे दाखल करतात, असेही ते म्हणाले. श्रीमंत गुरसाळे यांची आजवर ६ कोटी, तर महादेव सलगर यांची ७५ लाखांची फसवणूक झाली. अशा शेकडो वाहनधारकांची मिळून ही लूट २०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे ते म्हणाले. साखर कारखाने मुकादम किंवा मजुरांची कोणतीही हमी घेत नाहीत. मात्र, मजूर वेळेत न आल्यास वाहन मालकांना नोटिसा बजावणे किंवा त्यांची वाहने ओढून आणणे, अशा कारवाया कारखान्यांकडून केल्या जातात, असेही ते म्हणाले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here