सोलापूर : यंदाच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलनाची भूमिका घेतली जात आहे. उसाला पहिली उचल प्रतिटन पाच हजार रुपये मिळावी, अशी प्रमुख मागणी आहे. प्रति टन पाच हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीवरून जिल्ह्यातील पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यांत ऊसदर आंदोलनाने जोर धरला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या १५ ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले आहेत. पंढरपूर आणि माळशिरस परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्याच्या घटना घडल्या. यामुळे ऊस वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ऊस उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य मोबदला मिळावा आणि कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करावी, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. ऊस दर निश्चित झाल्याशिवाय गाळप हंगाम सुरू करण्यास विरोध करण्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार आणि ऊस उत्पादक यांच्यातील दराचा प्रश्न हंगामाच्या सुरुवातीलाच तापण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वाढता उत्पादन खर्च, खते, कीटकनाशकांच्या किमती, मजुरी तसेच सिंचन व वाहतुकीवरील खर्चामुळे ऊसशेतीचे आर्थिक गणित बिघडत आहे. ऊस दरावरून संघर्ष तीव्र होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


















