सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी तिन्हे येथील कंचेश्वर (पूर्वीचा सिध्दनाथ) साखर कारखान्यावर मागील ऊस गाळप हंगामातील थकीत ऊस बिलप्रश्नी ठिय्या आंदोलन करण्यात आले. कारखान्याने यंदाचा हंगाम सुरू झाला तरी मागील हंगामात गाळप केलेल्या उसाचे पैसे दिले नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मागील महिन्यात शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी या साखर कारखान्यावर आंदोलन केल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांची काही रक्कम जमा केली होती.
सिध्दनाथ साखर कारखान्याने मागील वर्षी गळीत हंगामात प्रतिटन अठ्ठावीसशे दर जाहीर केला होता. मात्र, ऊस उत्पादकांना २,२३६ रुपये दिले होते. शेतकऱ्यांनी ही रक्कमही अनेक वेळा हेलपाटे घातल्यानंतर मिळाली होती. त्यावरील रक्कम शेतकऱ्यांना मिळालीच नाही. शेतकऱ्यांनी सोमवारी पुन्हा आंदोलन सुरू केल्यानंतर काही रक्कम जमा करण्यात आली. उर्वरित रक्कम देण्याच्या मागणीसाठी बुधवारी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले. या कारखान्यासमोर रात्री उशीरापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते.


















