सोलापूर : 130 कोटींच्या थकीत ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

सोलापूर : गोकुळ साखर कारखान्याकडील तब्बल 130 कोटी रुपयांच्या थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला आहे. गेल्या 17 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज तलावात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले.

या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. यापूर्वीच शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार मोठ्या संख्येने शेतकरी तलाव परिसरात जमा झाले. संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. मात्र, संतप्त शेतकऱ्यांनी हे बॅरिकेड्स हटवत थेट तलावात प्रवेश केला आणि आंदोलन सुरू केले.

ChiniMandi WhatsApp Channel

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही अधिकारी तलावात उतरून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, थकीत ऊस बिलांबाबत ठोस निर्णय आणि हमी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी स्पष्ट केली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रा येथील गोकुळ साखर कारखान्याने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक ऊस उत्पादकांची बिले थकवली असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. याआधीही शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलनासह विविध प्रकारची आंदोलने केली होती. मात्र, त्यातूनही प्रश्न मार्गी न लागल्याने त्यांनी आता जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या आंदोलनामुळे प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनावरील दबाव वाढला असून, थकीत ऊस बिलांचा प्रश्न नेमका कधी निकाली निघणार याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here