सोलापूर : येथील ब्रिटिश राजवटीत सन १९३२ मध्ये स्थापन झालेल्या ऐतिहासिक दि सासवड माळी शुगर फॅक्टरी या खासगी साखर कारखान्याच्या मंगळवारी (दि. ७) झालेल्या बैठकीत संचालक मंडळाच्या निवडी पार पडल्या. माजी चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या चेअरमनपदाची धुरा आता मोहन लांडे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांची तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे ते दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचेही पदसिद्ध चेअरमन झाले आहेत. कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी विशाल जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी चेअरमन राजेंद्र गिरमे, मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके तसेच संचालक नंदकुमार गिरमे, परेश राऊत, यश बोरावके, राहुल गिरमे, अशोक गिरमे, सतीश गिरमे आणि निळकंठ भोंगळे उपस्थित होते. मोहन लांडे हे २०१४ पासून कारखान्याच्या संचालक मंडळावर कार्यरत असून शांत, अभ्यासू आणि समन्वयवादी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. विशाल जाधव हे २०१६ पासून संचालक असून त्यांना दोन वर्षांसाठी व्हाईस चेअरमनपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निखिल कुदळे हे २०२१ पासून संचालक मंडळावर कार्यरत असून यापूर्वी त्यांनी व्हाईस चेअरमन म्हणूनही काम पाहिले आहे.


















