सोलापूर : एनसीडीसीने सिद्धेश्वर साखर कारखान्याचा २०० कोटींचा कर्ज प्रस्ताव फेटाळला

सोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांना, विशेषतः आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना, राज्य सरकार आणि (केंद्र सरकारच्या एनसीडीसीच्या (नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) माध्यमातून सवलतीचे कर्ज आणि आर्थिक मदत पुरवली जाते. या कर्जाचा मुख्य उद्देश कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर देयके देणे हा असतो. या कर्जासाठी राज्य सरकार कर्जहमी देत असते. मात्र, या अंतर्गत सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने दिलेला सुमारे २०० कोटी रुपयांचा कर्ज प्रस्ताव एनसीडीसीने नामंजूर केला आहे. यामुळे कारखान्याच्या व्यवस्थापनासमोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहणार आहे.

सिद्धेश्वर कारखान्याकडून गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम थकवली जात आहे. शेतकऱ्यांची यापूर्वीची देणी प्रलंबित आहेत. शिवाय, चालू वर्षातील जवळपास ३० कोटी रुपये येणे-बाकी आहे. कर्ज नामंजूर झाल्यामुळे कारखान्यासमोर आर्थिक संकट उभे राहणार आहे. बाहेरील मोठ्या व्याजाने कर्ज सध्या संस्थेला परवडणारे नाही. कारखान्याचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल पाहता कर्जाचा डोंगर वाढत आहे. एनसीडीसीकडे राज्यातील १४ सहकारी साखर कारखान्यांचे प्रस्ताव सरकारने दाखल केले होते. यात सिद्धेश्वर कारखान्याचा १९९ कोटी ९४ लाख रुपयांचा कर्ज प्रस्ताव होता. मात्र, एनसीडीसीने केवळ सातच कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत.. तर उर्वरीत सात कारखान्यांचे प्रस्ताव फेटाळल्याने हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here