सोलापूर: यंदा तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे ऊस क्षेत्र घटले असून उसाची वाढही कमी झाली आहे. तरीही शेतकरी व सभासदांच्या निष्ठेच्या बळावर श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने आगामी हंगामात ४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. इतर कारखान्यांच्या बरोबरीने आणि वेळेवर ऊसदर दिला जाईल, अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली. मंगळवेढा येथील कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचा गळीत हंगामासाठी रोलर पूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
चेअरमन शिवानंद पाटील यांच्या हस्ते आणि व्हाईस चेअरमन तानाजी भाऊ खरात यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. संचालक गौडाप्पा बिराजदार व महादेव लुगडे यांच्या हस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. दामाजी कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत असे सांगून चेअरमन पाटील म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांनी विश्वासाने ही संस्था संचालक मंडळाच्या ताब्यात दिली. आम्हीही त्या विश्वासास पात्र राहून काम केले आहे. गेल्या चार वर्षांत स्पर्धेत राहून एफआरपीपेक्षा जास्त दर वेळेत दिला आहे. कामगारांचा फंड व दर महिन्याच्या १० तारखेच्या आत पगार देऊन कारखान्याची आर्थिक घडी बसवली आहे. यावेली संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, दिगंबर भाकरे, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक रमेश जायभाय आदी उपस्थित होते.


















