सोलापूर : ओंकार शुगरची साखर चोरणारे कानपूरमधून जेरबंद, अक्कलकोट दक्षिण पोलिसांची कामगिरी

सोलापूर: बाराबंकी येथील बिस्किट कंपनीला देण्यासाठी तडवळ येथील शुगर फॅक्टरीमधून नेलेली साखर चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील सराईत चोरट्यांच्या टोळीला अक्कलकोट दक्षिण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. २३ फेब्रुवारी रोजी सुमारे साडेसतरा लाख रुपयांची साखर पळविण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी आकाश अशोक कुशवाह, अभिषेक श्रवण पांडे, उपेंद्र सिंग रवींद्रसिंग भदोरीया व अरविंदकुमार भगवानदास गुप्ता या संशयितांना पोलिसांनी अटक केली. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर अधीक्षक प्रीतम यावलकर, उपअधीक्षक विलास यामावार, निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत बंधे, हवालदार सुभाष दासरे, जगदीश राठोड, सिंकदर मुल्ला, गजानन शिंदे, मळसिद्ध कोळी यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हडमानाराम भाखरराम विश्नोई (४०, रा. होसपेट, जि. विजयनगर, कर्नाटक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. झाशीवरून कोल्हापूरला गहू घेऊन आलेल्या संशयिताने परत जाताना रिकामे जात असल्याचे सांगत उत्तर प्रदेशातील काही भाडे आहे का? अशी विचारणा फिर्यादीस केली. विश्नोई यांनी ओंकार शुगर फॅक्टरीतील साखर बाराबंकी येथील बिस्किट कंपनीला द्यायची असल्याचे सांगितले. संशयिताने कारखान्यातून साखर उचलली आणि महाराष्ट्रात असेपर्यंत हडमानाराम यांच्याशी संपर्क ठेवला. नंतर मोबाईल बंद केला. पोलिसांनी संशयिताला मोबाइल सीमकार्ड पुरविणाऱ्यास पकडले आणि त्यानंतर या टोळीचा उलगडा झाला. भदोरीया हा उत्तर प्रदेशातून भाडे घेऊन येताना गाडीची कागदपत्रे खरी दाखवायचा आणि जाताना गाडीची कागदपत्रे बनावट तयार करायचा. यासाठी भदोरीया आकाशकडून चोरीचे मोबाईल घ्यायचा. पोलिसांनी संशयितांकडून साखरेची ५० किलोची ८३३ पोती व गुन्ह्यातील वाहन जप्त केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here