सोलापूर : थकीत ऊस बिलासह पहिली उचल जाहीर करण्याच्या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समिती आक्रमक

सोलापूर : आगामी गाळप हंगामात साखर कारखान्यांनी पहिली उचल किती देणार, हे स्पष्टपणे जाहीर करावे. पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कोणत्याही कारखान्याने गाळप सुरू करू नये, अशी ठाम भूमिका बैठकीत घेण्यात आली. दराबाबत शेतकऱ्यांना अंधारात ठेवून गाळप सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला संघटितपणे विरोध करण्याचा निर्धार ऊस दर संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आला. माढा येथे शासकीय विश्रामगृहात ऊस दर संघर्ष समितीची ही महत्त्वपूर्ण बैठक झाली. गावागावात जाऊन थकीत ऊस बिले, आगामी ऊस दर, पहिली उचल आणि शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या लढ्यात अधिकाधिक ऊस उत्पादकांना सहभागी करून घेण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

थकीत ऊस बिल मिळालेच पाहिजे, पहिली उचल जाहीर झालीच पाहिजे आणि शेतकऱ्याच्या उसाला योग्य व उच्चांकी दर मिळालाच पाहिजे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष केला जाईल, असा इशारा ऊस दर संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला. मागील गाळप हंगामातील थकीत ऊस बिले तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत अशी मागणी करण्यात आली. बैठकीत थकीत ऊस बिलांसह आगामी हंगामातील ऊसदराच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. थकीत बिलांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. उसाचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखानदारांना जाब विचारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी दीपक भोसले, सचिन पाटील, निवास नागणे, अमोल वेदपाठक, चंद्रकांत बागल, शिवाजीभाऊ पाटील, बापू गायकवाड मेजर, सुहास पाटील, अभिजीत साठे, अजित परबत, सत्यवान गायकवाड, देविदास खरात, मालोजी आडकर आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here