सोलापूर : पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कारखाना कार्यस्थळावर पंढरपूरला आषाढी एकादशी वारीनिमित्त जाणाऱ्या विठ्ठल भक्त वारकऱ्यांना लाडू व चिवडा वाटपास सुरूवात करण्यात आली. जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा, कारखान्याचे संचालक रणजितसिंह शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता शिंदे यांच्या हस्ते अल्पोपहार उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावर्षीही वीस हजार लाडू व चिवडा पाकिटांचा वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात येणार आहे.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आ. बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना लाडू व चिवडा अल्पोपहाराचे वाटप उपक्रम राबविण्यात येतो. कारखाना कार्यस्थळावर जामखेड येथील हभप रासकर महाराज यांची वारकरी दिंडी दरवर्षी मुक्कामी येत असून त्यांना कारखान्यामार्फत जेवणाची सोय करण्यात येते. कारखान्याच्या या सेवाभावी उपक्रमामुळे वारकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. याविषयी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे म्हणाले की, गेल्या वीस वर्षांपासून कारखान्यामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. माजी आ. बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा’ मानून विठ्ठलराव शिंदे कारखाना दरवर्षीप्रमाणे हा सेवाभावी उपक्रम राबवत आहेत.


















