पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव व छायाचित्र तसेच सुनेत्रा पवार यांचा व्हिडिओ परवानगीशिवाय वापरल्याप्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर पक्षाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी स्पष्ट केले.सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनेल’चा जाहीरनामा जय पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला असता जय पवार यांनी कारवाईचे संकेत दिले.
जय पवार म्हणाले, अजितदादांचे नाव आणि छायाचित्र परवानगीशिवाय वापरू नये, असे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, जगताप यांनी सुनेत्रावहिनींचा व्हिडिओ वापरून आपल्या पॅनेलचा प्रचार केला. तसेच अजितदादांचा आवाज असलेला व्हिडिओदेखील वापरण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नेमकी कोणती कारवाई केली जाणार, हे लवकरच जाहीर केले जाईल.दरम्यान, पुरुषोत्तम जगताप यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या इतर व्यक्तींवर कारवाई केली जाणार नसल्याचेही जय पवार यांनी स्पष्ट केले. “ही परिस्थिती एका व्यक्तीमुळे निर्माण झाली असून, हे सर्व जगताप यांच्यामुळे झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांनी गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम केले असून, त्याच कार्यपद्धतीने सोमेश्वर कारखाना चालविण्यावर आमचा भर असल्याचे जय पवार यांनी सांगितले. कारखाना योग्य पद्धतीने चालविणे हेच आमचे उद्दिष्ट असून, त्यामागे कोणताही राजकीय स्वार्थ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील भाजपच्या सहभागाबाबत विचारले असता जय पवार म्हणाले, “ही कोणत्याही राजकीय पक्षाची निवडणूक नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे त्या पद्धतीने पाहिले जाऊ नये.”


















