सांगली : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील युवा शेतकरी वैभव धोंडिराम हाके यांनी हळद व उसाची तंत्रशुद्ध शेती करून उत्पादकता व गुणवत्ता वाढवली आहे. ऊस खोडव्याचे ३५ गुंठ्यात सुमारे ९८ टनांपर्यंत उल्लेखनीय उत्पादनही त्यांनी अलीकडेच घेतले आहे. तर हळदीचे एकरी ३० ते ४० क्विंटलपर्यंत तर लागवडीच्या ऊस उत्पादनात दरवर्षी शंभर टनांच्या पुढे सातत्य ठेवले आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशीलतेचा हा वारसा वैभव यांनी पुढे चालवला. शेतीचा अनुभव घेताना बीएची पदवी प्राप्त केली. आज प्रयोगशील व हळद, ऊस पिकातील मास्टर शेतकरी म्हणून त्यांनी अल्पावधीत ओळख तयार केली आहे.
वैभव यांनी ऊस, हळदीचा शाखीय अभ्यास केला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे ज्ञानयाग हा पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतो. दोनवेळा वैभव यांनी या कार्यक्रमात प्रशिक्षण घेतले. आपण कुठे कमी पडतो, चुकतो, सुधारणा कुठे करायला हवी या बाबी अभ्यासल्या व त्यानुसार व्यवस्थापनात बदल केले. वैभव यांनी मागील दहा वर्षांपासून शेतीतील जमा-खर्चाच्या नोंदी ठेवल्या. त्यामुळे दरवर्षी शेती अर्थकारणाचे मूल्यमापन होते. हळद, उसाच्या तंत्रशुद्ध शेतीतून उत्पादनासह गुणवत्तेत वाढ करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान त्यांनी ओळखले. त्याचा अभ्यास केला.
दरवर्षी माती परीक्षण करून अहवालानुसार तसेच जमिनीचा सामू तपासून अन्नद्रव्यांचे काटेकोर व्यवस्थापन ते करतात. तसेच पीक फेरपालटाला त्यांनी महत्व. हळद लागवड केलेल्या क्षेत्रात आडसाली ऊस लागवड. खोडवा, त्यानंतर हळद असे करत पुन्हा तीन वर्षांनी ते क्षेत्र हळद लागवडीखाली येईल असे नियोजन. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पीक उत्पादनवाढीस मदत होते असे वैभव सांगतात. हळदीत स्वीटकॉर्न, मेथी व कोथिंबीर या आंतरपिकांचा वापर करून मुख्य पिकाचा उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. हळदीचे एकरी ३० ते ४० क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांनी घेतले आहे.


















