साखरेची एमएसपी ५५ रुपये करावी; औद्योगिक व ग्राहकांसाठी स्वतंत्र दर करावेत : आमदार डॉ. विनय कोरे

कोल्हापूर : देशातील साखरेची गरज आणि उत्पादन यामध्ये आगामी काळात तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे. देशाला सुमारे २७० लाख टन साखरेची गरज असताना यंदा केवळ २५० लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे साखरेची आयात करावी लागू शकते आणि परिणामी साखरेचे दर प्रतिकिलो ५० रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने औद्योगिक वापरासाठी आणि ग्राहकांसाठी साखरेचे स्वतंत्र दर निश्चित करावेत, अशी मागणी वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली.

तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कारखान्याकडून गतहंगामातील दुसरा हप्ता प्रतिटन ११९ रुपये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार असल्याची घोषणाही डॉ. कोरे यांनी केली. दरम्यान, साखरेची आधारभूत विक्री किंमत अर्थात एमएसपी प्रतिकिलो ५५ रुपये करावी, असा ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केला.

ChiniMandi WhatsApp Channel

डॉ. कोरे म्हणाले, “१५ डिसेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत गाळपासाठी येणाऱ्या सभासदांच्या उसासाठी नियमित साखरेव्यतिरिक्त प्रतिटन अर्धा किलो अतिरिक्त साखर दिली जाईल. तसेच १५ जानेवारीपासून गाळप हंगाम संपेपर्यंत सभासदांना प्रतिटन एक किलो अतिरिक्त साखर देण्यात येईल. बिगरसभासदांच्या उसासाठीही प्रतिटन एक किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” दरवर्षी उसाची एफआरपी वाढत असली, तरी साखरेची आधारभूत विक्री किंमत गेल्या दहा वर्षांपासून प्रतिकिलो ३१ रुपये आहे. त्यामुळे ही किंमत वाढवून ५५ रुपये करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

एमएसपी ५५ रुपये करण्याच्या ठरावाचे जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी काही सूचना सभेसमोर मांडल्या. सभेला कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव, उपाध्यक्ष अॅड. एन. आर. पाटील, नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष एन. एच. पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते. प्रा. एन. आर. चोपडे यांनी सूत्रसंचालन केले, तर संचालक सुभाष पाटील यांनी आभार मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here