देशातील इथेनॉल पुरवठ्यात उसाच्या रसाचे मोठे योगदान, एप्रिलअखेर पुरवठा पोहोचला ५१५ कोटी लिटरवर

नवी दिल्ली : यंदाच्या इथेनॉल वर्षात ३० एप्रिलअखेर तेल कंपन्यांना विविध उद्योगांकडून सुमारे ५१५ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा झाला आहे. यामध्ये उसावर आधारित कच्च्या मालामध्ये उसाचा रस हा सर्वांत मोठा योगदानकर्ता ठरला आहे. उसाच्या रसाच्या आधारित १६४ कोटी लिटर इथेनॉलचा करार करण्यात आला होता. त्यापैकी सुमारे १३० कोटी लिटर पुरवठा झाला असून, हा करारबद्ध प्रमाणाच्या ७९ टक्के आहे. गाळप हंगामात उसाचा रस वापरून इथेनॉल निर्मितीला मिळालेला वेग यामागे महत्त्वाचा घटक मानला जात आहे. सद्यस्थितीत तेल विपणन कंपन्यांकडून करारबद्ध करण्यात आलेल्या १०५९ कोटी लिटर इथेनॉलपैकी जवळपास ४९ टक्के पुरवठा पूर्ण झाला आहे.

एप्रिलमध्येही देशातील इथेनॉल मिश्रण कार्यक्रमात धान्याधारित डिस्टिलरीजचे योगदान वाढत असल्याचे चित्र कायम राहिले. या गाळप हंगामात उसाच्या रसापासून होणारा इथेनॉल पुरवठा मजबूत राहिला. जानेवारी २०२६ मध्ये रसावर आधारित पुरवठा सुमारे ३१.८५ कोटी लिटरपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातही ही गती कायम राहिली. त्यामुळे चालू हंगामात इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा बी-हेवी मळीपासून सुमारे ११३ कोटी लिटरचा करार करण्यात आला होता. त्यापैकी सुमारे ४५ कोटी लिटर पुरवठा झाला आहे. सी-हेवी मळीपासून १४ कोटी लिटरच्या कराराच्या तुलनेत सुमारे ७ कोटी लिटर पुरवठा झाला असून, तो ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. एकूण उसावर आधारित इथेनॉलचा पुरवठा करार केलेल्या २९१ कोटी लिटरच्या तुलनेत सुमारे १८२ कोटी लिटर इतका झाला आहे. धान्याधारित डिस्टिलरीजमधून होणाऱ्या इथेनॉल पुरवठ्यात मक्यावर आधारित ४७९ कोटी लिटर इथेनॉलचा करार केला होता. त्यापैकी सुमारे १८२ कोटी लिटर पुरवठा झाला आहे. अतिरिक्त अन्नधान्य स्रोतांमधून २३३ कोटी लिटरच्या कराराच्या तुलनेत सुमारे १२५ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा झाला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here