पेट्रोल पंपांवर पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण सांगणे बंधनकारक करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 31 ऑगस्टला सुनावणी

नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये मिसळण्यात आलेल्या इथेनॉलचे अचूक प्रमाण प्रत्येक पेट्रोल पंपाच्या डिस्पेन्सिंग नोजलवर स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 31 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. केंद्र सरकार आणि संबंधित प्राधिकरणांना याबाबत आवश्यक निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या 31 ऑगस्टच्या कार्यसूचीनुसार, न्यायमूर्ती एम. एम. सुंदरश आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

पेट्रोलच्या बिलावरही इथेनॉलचे प्रमाण नमूद करण्याची मागणी

ChiniMandi WhatsApp Channel

याचिकेत प्रत्येक इंधनाच्या बिलावर विक्री करण्यात आलेल्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचे किती टक्के मिश्रण आहे, हे स्पष्ट आणि वाचण्यास सुलभ पद्धतीने नमूद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच, संबंधित प्राधिकरणांनी निश्चित कालावधीत वाहननिहाय इथेनॉल इंधन सुसंगततेचा अधिकृत आणि सार्वजनिकरीत्या शोधता येणारा डेटाबेस तयार करून प्रसिद्ध करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.या डेटाबेसमध्ये वाहन निर्माता कंपनी, मॉडेल, इंजिनचा प्रकार आणि वाहनाच्या उत्पादनाचे वर्ष यानुसार वेगवेगळ्या प्रमाणातील इथेनॉल मिश्रित पेट्रोल संबंधित वाहनासाठी योग्य आहे की नाही, याची माहिती देण्यात यावी, असे याचिकेत म्हटले आहे.

E20 इंधनाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समितीची मागणी

याचिकेत स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या समितीत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय मानक ब्युरो (BIS) यांचे प्रतिनिधी तसेच स्वतंत्र ऑटोमोबाईल अभियंते यांचा समावेश करण्याची मागणी आहे.सध्याच्या वाहनांमध्ये E20 इंधनाची प्रत्यक्ष वापरातील सुसंगतता तपासून त्याबाबत सार्वजनिक अहवाल सादर करण्याचे काम या समितीला देण्यात यावे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

E20 इंधनाचा पुढील बाबींवर होणारा परिणाम तपासण्याची मागणी करण्यात आली आहे:

वाहनाच्या इंधन कार्यक्षमतेवर आणि मायलेजवर होणारा परिणाम

इंजिनच्या आयुष्यावर होणारा परिणाम

वाहनाच्या देखभाल खर्चावर होणारा परिणाम

वाहनाची वॉरंटी आणि विमा यावर होणारे परिणाम

पर्यावरणावरील एकूण परिणाम

वाहनाच्या टेल-पाइपमधून होणारे उत्सर्जन

इथेनॉल उत्पादनासाठी लागणाऱ्या पाण्याचा वापर

कथित अन्नसुरक्षा आणि पशुखाद्याशी संबंधित समस्या

इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी राष्ट्रीय ग्राहक माहिती प्रणालीची मागणी

सर्व प्रकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी राष्ट्रीय ग्राहक माहिती प्रोटोकॉल तयार करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. हा प्रोटोकॉल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) आणि भारतीय मानक ब्युरो (BIS) यांच्या सल्लामसलतीने तयार करावा, अशी मागणी आहे.तसेच E20 इंधनाची अनिवार्य अंमलबजावणी करण्याच्या समर्थनार्थ असलेल्या धोरणात्मक कागदपत्रे, तांत्रिक अभ्यास, वाहन सुसंगतता अहवाल, सुरक्षा मानके, ग्राहकांसाठी जारी करण्यात आलेल्या सूचना आणि सार्वजनिक सल्लामसलतीशी संबंधित नोंदी सुप्रीम कोर्टासमोर सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

जुन्या आणि E20-सुसंगत नसलेल्या वाहनांसाठी संक्रमण आराखड्याची मागणी

जुन्या तसेच E20 इंधनासाठी सुसंगत नसलेल्या वाहनांसाठी कालबद्ध आणि पारदर्शक संक्रमण आराखडा तयार करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.तांत्रिक, आर्थिक आणि लॉजिस्टिकदृष्ट्या शक्य असेल त्या ठिकाणी कमी प्रमाणात इथेनॉल मिश्रित पेट्रोल स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्याचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबतचा निर्णय तज्ज्ञांचे अहवाल, ठोस तांत्रिक माहिती आणि सार्वजनिक सल्लामसलत यांच्या आधारे तर्कसंगत आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावा, असे याचिकेत म्हटले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here