तामिळनाडू : कोइम्बतूरमध्ये ९० कोटींचे ऊस उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार; शेतकऱ्यांसाठी नवे संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ

कोइम्बतूर : देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा निर्णय घेत कोइम्बतूर (तामिळनाडू) येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट (एसबीआय) येथे ‘ऊस उत्कृष्टता केंद्र’ (शुगरकेन सेंटर ऑफ एक्सलन्स) स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी संयुक्तपणे ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली.

कोइम्बतूर येथे शास्त्रज्ञांसोबत झालेल्या विचारमंथन बैठक, प्रयोगशाळा भेटी आणि क्षेत्रीय संवादानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयसीएआर-एसबीआयचे संचालक पी. गोविंदराज, तामिळनाडू सरकारचे अतिरिक्त साखर आयुक्त अरुणराज, तसेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) चे पदाधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या संयुक्त सहकार्याने हे उत्कृष्टता केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी साखर उद्योगाकडून ४५ कोटी रुपये आणि केंद्र सरकारकडून सुमारे ४५ कोटी रुपये, अशा एकूण ९० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

या केंद्रामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक संशोधन, सुधारित ऊस वाण, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रात्यक्षिके आणि शास्त्रीय मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिक उत्पादन, चांगला साखर उतारा आणि कमी खर्चात ऊस शेती शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाटील म्हणाले की, भविष्यातील हवामान बदलाचा विचार करून कमी पाण्यात, अधिक पर्जन्यमानात, क्षारयुक्त जमिनीत आणि उष्ण हवामानात टिकून राहणाऱ्या ऊस वाणांच्या निर्मितीवर भर दिला जाणार आहे. याशिवाय खोडवा उत्पादनक्षमता वाढविणे, निविष्ठांचा कार्यक्षम वापर, तसेच इथेनॉल, बायो-सीएनजी आणि हरित ऊर्जेसाठी उपयुक्त ऊस वाण विकसित करण्यावर संशोधन केंद्रित केले जाणार आहे.

देशातील साखर उद्योगाची व्याप्ती स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, या उद्योगावर सहा कोटींहून अधिक शेतकरी, सुमारे ५० लाख कारखाना कर्मचारी आणि एक कोटीहून अधिक हंगामी मजुरांचे रोजगार अवलंबून आहेत. या उद्योगाची वार्षिक उलाढाल १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, शासनाला १६ हजार कोटी रुपयांहून अधिक कर महसूल मिळतो. यावेळी आयसीएआर-एसबीआयचे संचालक पी. गोविंदराज म्हणाले की, या निधीमुळे संस्थेतील पायाभूत सुविधांतील तफावत दूर होईल. जनुकशास्त्र, जीनोम एडिटिंग जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने रोगप्रतिकारक, हवामान बदलाला सक्षम आणि अधिक उत्पादनक्षम ऊस वाण विकसित करण्याच्या संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे जैविक व अजैविक ताणांना तोंड देणाऱ्या नवीन ऊस जाती विकसित करण्याचे काम अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशातील सर्वात जुनी ऊस संशोधन संस्था

कोयंबतूर येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट ही भारतातील ऊस संशोधनासाठीची सर्वात जुनी आणि अग्रगण्य संस्था आहे. सन १९१२ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या ११० वर्षांहून अधिक काळात देशातील अनेक सुधारित ऊस वाण विकसित करून ऊस उत्पादनवाढीत मोलाचे योगदान दिले आहे. भविष्यात उभारण्यात येणारे ‘ऊस उत्कृष्टता केंद्र’ या संस्थेच्या संशोधन क्षमतेला नवी उंची देणार असून, त्याचा थेट लाभ देशातील लाखो ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here