साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज : संजय खताळ

सोलापूर : महाराष्ट्रासह देशातील साखर उद्योग सध्या मोठ्या आर्थिक संकटाच्या दुष्टचक्रात अडकला असल्याचे चित्र दिसून येत आहे. उसाचा वाढता खर्च, सलग पाच वर्षे साखरेच्या दरात वाढ नाही. परंतु सातत्याने उसाच्या एफआरपीत वाढ, बँकांचे वाढते कर्ज आणि ऊस उपलब्धतेतील घट, या कारणांमुळे अनेक साखर कारखान्यांची आर्थिक घडी विस्कटत चालली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या ऊस बिलांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाने दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी केले.

श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना व दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने साखर उद्योग मंथन चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी चेअरमन प्रशांत परिचारक, द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) चे अध्यक्ष सोहन शिरगावकर, व्हा. चेअरमन कैलास खुळे, दिनकर मोरे आदी उपस्थित होते.यावेळी सोहन शिरगावकर म्हणाले, आजची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण साखर कारखानदारी सरकारी नियंत्रणात गेली आहे. साखर व इथेनॉल निर्यात धोरण शासनाने अवलंबले परंतु त्यामध्ये सातत्याने बदल होत गेल्याने जास्त क्षमता असणाऱ्या साखर कारखान्यांना मर्यादा आली व जेवढी रक्कम गुंतवणूक झाली, त्याचा परतावा कमी मिळू लागला. त्यामुळे परिणामी कारखाने आर्थिक संकटात गेले. म्हणून राज्य व केंद्र सरकारने जे धोरण अवलंबले त्यामध्ये सातत्य राखणे फार गरजेचे आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

प्रशांत परिचारक म्हणाले, ग्रामीण भागातील महत्त्वाचा उद्योग म्हणून साखर कारखान्यांना पाहिले जाते. परंतु आज या उद्योगावर आर्थिक, नैसर्गिक, ऊस उत्पादकांची मानसिकता व स्पर्धात्मक संकट दिवसेंदिवस येऊ लागले आहेत. कारखाना स्तरावर व्यवस्थापनाने आज कठोर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या संस्थेचे अर्थकारण जर मजबूत राहिले नाही तर हा उद्योग उद्ध्वस्त होईल. भविष्यकाळात हा व्यवसाय टिकण्यासाठी सरकार ही प्रयत्न करत आहे. डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, शासन स्तरावरून गाळपाची एकच तारीख निश्चित करून बंधनकारक करावी. अनेक कारखान्याने एफआरपी देण्यासाठी कोट्यवधींचे कर्ज काढले आहे. या कर्जाची परतफेड येणाऱ्या कालावधीमध्ये कशी होणार, हा प्रश्न साखर उद्योगासमोर आहे. म्हणून आज आपण पांडुरंग कारखान्यावर साखर उद्योग मंथन चर्चासत्र ठेवले असल्याचे सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here