कोल्हापूर : सध्या संपूर्ण देशात उन्हाळ्याचा तडाखा वाढत आहे. तापमान वाढल्यामुळे शीतपेये, आइस्क्रीम आणि रसवंतिगृहांकडून साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाढीव मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने मार्चमधील २२ लाख टन कोट्याच्या तुलनेत एप्रिलसाठी २३ लाख टनांचा कोटा निश्चित केला आहे. यामुळे बाजारपेठेत साखरेची उपलब्धता पुरेशी राहील, असा सरकारचा अंदाज आहे. मात्र, हा कोटा गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० हजार टनांनी कमी आहे. गेल्यावर्षी, एप्रिल २०२५ मध्ये केंद्र सरकारने यापेक्षा अधिक म्हणजे, २३.५ लाख टन साखरेचा कोटा मंजूर केला होता.
साखर उत्पादक राज्यांमध्ये सध्या गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अशा स्थितीत कारखान्यांकडे साखरेचा मोठा साठा उपलब्ध आहे. वाढीव कोटा मिळाल्यामुळे कारखान्यांना रोख सुलभता मिळण्यास मदत होईल, असे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने बुधवारी (ता. २५) एप्रिल महिन्यासाठीचा कोटा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने उत्पादनातील चढ-उतार आणि उपलब्ध साठा यांचा विचार करून केंद्राने हा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे, असे सूत्रांनी सांगितले. कारखान्यांना हा कोटा महिनाभराच्या कालावधीतच विकणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाईचे संकेतही विभागाने दिले आहेत.

















