जून 2026 मध्ये देशाचे जीएसटी संकलन 13.9 टक्क्यांनी वाढले; महसूल 1.94 लाख कोटी रुपयांवर पोहोचला

नवी दिल्ली : जून 2026 मध्ये देशाचे एकूण वस्तू व सेवा कर (GST) संकलन 1 लाख 94 हजार 812 कोटी रुपये इतके झाले असून, जून 2025 मधील 1 लाख 71 हजार 105 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 13.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, आयात महसुलात झालेल्या मोठ्या वाढीमुळे ही वाढ नोंदवली गेली असून, आयातीतून मिळालेला महसूल देशांतर्गत जीएसटी संकलनापेक्षा अधिक वेगाने वाढला आहे. जून 2026 मधील निव्वळ जीएसटी संकलन 1 लाख 62 हजार 377 कोटी रुपये इतके राहिले. जून 2025 मधील 1 लाख 45 हजार 984 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 11.2 टक्क्यांची वाढ झाली आहे.

आकडेवारीनुसार, देशांतर्गत आणि आयात-आधारित कर महसुलामध्ये लक्षणीय तफावत दिसून आली. देशांतर्गत सकल जीएसटी महसूल 6.5 टक्क्यांनी वाढून 1 लाख 34 हजार 774 कोटी रुपये झाला. जून 2025 मध्ये तो 1 लाख 26 हजार 506 कोटी रुपये होता.दुसरीकडे, आयातीतून मिळणाऱ्या जीएसटी महसुलात तब्बल 34.6 टक्क्यांची वाढ झाली. जून 2025 मधील 44 हजार 600 कोटी रुपयांच्या तुलनेत जून 2026 मध्ये हा महसूल 60 हजार 38 कोटी रुपयांवर पोहोचला.

ChiniMandi WhatsApp Channel

जीएसटी परताव्यातही मोठी वाढ…

जून 2026 दरम्यान केंद्र सरकारने 32 हजार 436 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा (रिफंड) वितरित केला. जून 2025 मध्ये वितरित करण्यात आलेल्या 25 हजार 121 कोटी रुपयांच्या तुलनेत हा 29.1 टक्क्यांनी अधिक आहे.चालू आर्थिक वर्षात जून 2026 अखेर देशाचे एकूण सकल जीएसटी संकलन 6 लाख 31 हजार 699 कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीतील 5 लाख 82 हजार 542 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 8.4 टक्क्यांची वाढ झाली आहे.याच कालावधीत देशांतर्गत महसूल 2.8 टक्क्यांनी वाढून 4 लाख 54 हजार 427 कोटी रुपये झाला, तर आयात महसूल 26.2 टक्क्यांनी वाढून 1 लाख 77 हजार 273 कोटी रुपये झाला. या कालावधीत सरकारने 91 हजार 482 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा दिला असून, त्यानंतरचे निव्वळ जीएसटी संकलन 5 लाख 40 हजार 218 कोटी रुपये राहिले.

महाराष्ट्र जीएसटी संकलनात अव्वल…

राज्यानुसार पाहता, औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने जीएसटी संकलनात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. जून 2025 मधील 28 हजार 248 कोटी रुपयांच्या तुलनेत जून 2026 मध्ये राज्याचे जीएसटी संकलन 9 टक्क्यांनी वाढून 30 हजार 714 कोटी रुपये झाले.कर्नाटक आणि गुजरात यांनीही दुहेरी अंकातील वाढ नोंदवली असून, त्यांचे संकलन अनुक्रमे 12 हजार 937 कोटी रुपये आणि 11 हजार 743 कोटी रुपये इतके झाले. उत्तर प्रदेशात जीएसटी संकलनात 19 टक्क्यांची उल्लेखनीय वाढ होऊन ते 9 हजार 165 कोटी रुपये झाले.

काही राज्यांमध्ये महसुलात घसरण…

दुसरीकडे, काही राज्यांमध्ये जीएसटी संकलनात मोठी घट झाली आहे. सिक्कीममध्ये सर्वाधिक 53 टक्क्यांची घसरण झाली असून, संकलन 364 कोटी रुपयांवरून 170 कोटी रुपयांवर आले आहे.तसेच पुदुच्चेरीमध्ये 28 टक्के, हिमाचल प्रदेशमध्ये 26 टक्के आणि उत्तराखंडमध्ये 21 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. तामिळनाडूमध्येही किरकोळ 2 टक्क्यांची घट झाली असून, जीएसटी संकलन 9 हजार 963 कोटी रुपयांवरून 9 हजार 776 कोटी रुपये इतके राहिले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here