शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पंजाब सरकार सरसावले; शेतकरी मिलन कार्यक्रमाचे आयोजन

चंदीगड: शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता पंजाब सरकारने ‘सरकार-शेतकरी मिलन’ कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यातील पहिला संवाद १२ फेब्रुवारी रोजी पंजाब कृषी विद्यापीठ परिसरामध्ये  होईल. येथे मुख्यमंत्री भगवंत मान शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकतील. या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकारने ६ जानेवारी रोजी बैठक घेतली होती. त्याचसंधर्भात २० जानेवारी रोजी दुसरी बैठक होणार आहे.
याबाबत न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की शेतकरी आंदोलनात सहभागी होतात आणि सर्वसामान्यांसाठीही समस्या निर्माण करतात. त्यामुळे पंजाब सरकारने शेतकऱ्यांना एका व्यासपीठावर आणून मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे सरकारला वाटत आहे. संवादाने अनेक प्रश्न सुटू शकतात. सरकार-शेतकरी मिलन कार्यक्रमादरम्यान, विविध कृषी तज्ञांचा सहभाग असेल आणि अनेक सत्रे आयोजित केली जातील. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे १५० शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ६ हजार शेतकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बैठकीत कृषी क्षेत्राची अद्ययावत माहिती समोर आणण्याचाही सरकारचा विचार आहे. पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here